Pune Crime: एमएनजीएलचे बिल भरण्याचा बहाणा करून ज्येष्ठाला १६ लाखांचा चुना
By भाग्यश्री गिलडा | Published: April 6, 2024 04:19 PM2024-04-06T16:19:34+5:302024-04-06T16:21:18+5:30
सायबर चोरट्याने राहुल शर्मा नामक कर्मचारी असल्याचे भासवून तब्बल १६ लाखांचा गंडा घातला....
पुणे : एमएनजीएलचे बिल भरण्याचे बाकी आहे ते तत्काळ भरा असे सांगून सायबर चोरट्यांनी शिवाजीनगर परिसरात राहणाऱ्या वृद्धाची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. सायबर चोरट्याने राहुल शर्मा नामक कर्मचारी असल्याचे भासवून तब्बल १६ लाखांचा गंडा घातला.
अधिक माहितीनुसार हा प्रकार शुक्रवारी (दि. ०५) घडला आहे. सिमला ऑफिस परिसरात राहणाऱ्या ६६ वर्षीय वृद्धाने शिवाजीनगर पोलिसांना फिर्याद दिली आहे. त्यानुसार तक्रारदार यांना एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. एमएनजीएलकडून राहुल शर्मा बोलत असल्याचे सांगितले. तुमचे मागील महिन्याचे वीजबिल भरलेले नाही, ते तत्काळ भरा असे सांगितले. त्यांनतर ते भरण्यासाठी एक अप्लिकेशन डाउनलोड करण्यास सांगितले. अप्लिकेशनचा वापर करून रिमोट ऍक्सेस मिळवला.
खासगी माहितीचा वापर करून फिर्यादींच्या बँक खात्यावर परस्पर १६ लाख २२ हजार ३१० रुपयांचे परस्पर लोन घेतले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादींनी पोलीस ठाण्यात धाव घेत झालेल्या प्रकारचा जबाब दिला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक माने हे करत आहेत.