फ्लॅट भाडेतत्वावर घेण्याचे सांगून ज्येष्ठाला दीड लाखांचा गंडा
By भाग्यश्री गिलडा | Published: July 7, 2023 05:37 PM2023-07-07T17:37:43+5:302023-07-07T17:38:00+5:30
फ्लॅट घेण्यासाठी रजिस्ट्रेशन करायचे आहे असे सांगून ज्येष्ठाकडून पैसे उकळण्यास सुरुवात केली.
पुणे: सोशल मीडियावर फ्लॅट भाडेतत्वावर देण्यासाठी जाहिरात टाकली असता सायबर चोरट्याने त्याचा फायदा घेत ज्येष्ठाची फसवणूक केल्याची घटना घडली आहे.
भगवान राघु चौधरी (वय ७९, नानापेठ) यांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार, चौधरी हे पिंपरी चिंचवड येथील म्हाडा कॉलनीमधील फ्लॅट भाडेतत्वावर देण्यास इच्छूक होते. त्यांनी सोशल मीडियावर फ्लॅट भाडेतत्वावर देण्यासाठी जाहिरात टाकली. त्यांनतर त्यांना अनोळखी क्रमांकावरून फोन येऊन फ्लॅट घेण्यास इच्छूक असल्याचे सांगितले. फ्लॅट घेण्यासाठी रजिस्ट्रेशन करायचे आहे असे सांगून चौधरी यांच्याकडून पैसे उकळण्यास सुरुवात केली. त्यांनतर वेगवेगळी कारणे देत चौधरी यांच्याकडून तब्बल १ लाख ४९ हजार ९८० रुपये उकळले. चौधरी यांना संशय आल्याने त्यांनी विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे दिल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे हे करत आहेत.