Pune Crime: दीडशे रुपये मोबदला देऊन तरुणाचे १३ लाख रुपये हडपले, गुन्हा दाखल
By भाग्यश्री गिलडा | Published: January 8, 2024 04:27 PM2024-01-08T16:27:31+5:302024-01-08T16:28:27+5:30
याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात शनिवारी (दि. ७) गुन्हा दाखल केला आहे...
पुणे : पार्ट टाइम जॉबचे आमिष दाखवून दिलेले टास्क पूर्ण केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून तरुणाची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात शनिवारी (दि. ७) गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत वाघोली परिसरात राहणाऱ्या एका २८ वर्षीय तरुणाने पोलिसांत फिर्याद दिली आहे. पार्ट टाइम जॉब ‘वर्क फ्रॉम होम’ द्वारे चांगले पैसे कमावता येतील असा मेसेज तरुणाच्या व्हॉट्सॲपवर आला. दिलेले काम पूर्ण केल्यास चांगला परतावा मिळेल आणि हे काम तुम्ही घरबसल्या करू शकता असे आमिष दाखवले. तरुणाने काम करण्यास होकार दिल्यावर एका टेलिग्राम ग्रुपमध्ये ॲड करण्यात आले. त्यानंतर वेगवेगळे टास्क दिले गेले.
सुरुवातीला टास्क पूर्ण केल्याचा चांगला मोबदला देऊन तरुणाचा विश्वास संपादन केला. पैशांची गुंतवणूक केल्यास अधिक नफा मिळेल असे सांगून तरुणाला तब्बल १३ लाख ६६ हजार रुपये भरण्यास भाग पाडले. पैसे भरूनही परतावा न मिळाल्याने हडपसर पोलिस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक शिवले हे करत आहेत.