विमानाच्या तिकिटाचे रिफंड देतो सांगून महिलेला सव्वाचार लाखांचा गंडा
By भाग्यश्री गिलडा | Published: October 11, 2023 05:11 PM2023-10-11T17:11:35+5:302023-10-11T17:11:50+5:30
उड्डाण रद्द झाल्याचा बहाणा सांगून रिमोट ऍक्सेसद्वारे फसवणूक केल्याचा प्रकार
पुणे : विमानाचे उड्डाण रद्द झाल्याचा बहाणा सांगून रिमोट ऍक्सेसद्वारे फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बिबवेवाडी परिसरात राहणाऱ्या ३५ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार ८ जून २०२३ रोजी घडला आहे. फिर्यादीत म्हटल्याप्रमाणे, महिलेने इक्सीगो या अप्लिकेशनवरून नागपूरला जाण्यासाठी तिकीट बुक केले होते. विमानाचे उड्डाण रद्द झाल्याने महिलेने पैसे परत मिळवण्यासाठी गुगलवरून कस्टमर केअरचा नंबर मिळवला. कस्टमर केअरला फोन केला असता रद्द झालेल्या विमान तिकिटांची एकूण १३ हजार रुपये रक्कम रिफंड मिळवून देतो असे सांगितले. त्यानंतर महिलेला अनोळखी अप्लिकेशन डाउनलोड करण्यास सांगून त्याद्वारे मिळालेल्या रिमोट ऍक्सेस मिळवला. अप्लिकेशन डाउनलोड केल्यावर रिमोट ऍक्सेसचा गैरफायदा घेऊन खासगी माहितीच्या आधारे महिलेच्या बँक खात्यातून तब्बल ४ लाख २५ हजार रुपये परस्पर ट्रान्स्फर करून घेतले. याप्रकरणी राजेशकुमार या मोबाईल धारकाविरोधात मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे करत आहेत.