खंडणी मागणारा बाप तुरुंगात; मुलाच्या अंगी तेच गुण, बापापाठोपाठ मुलाला अटक
By विवेक भुसे | Published: August 3, 2023 04:17 PM2023-08-03T16:17:25+5:302023-08-03T16:17:50+5:30
बाप तुरुंगात असताना आता त्याचा मुलगा बापाच्या नावाने खंडणी मागत फिरु लागला होता
पुणे : बाप तुरुंगात असताना आता त्याचा मुलगा बापाच्या नावाने खंडणी मागत फिरु लागला असून लष्कर पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला असून अटक करण्यात आली आहे. अनस फिरोज खान (रा. चुडामन तालीम, भवानी पेठ) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी रुपेश सोपानराव डाके (वय ५१, रा. बाबाजान चौक, कॅम्प) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार बाबाजान चौकाजवळील राजे चायनिज फास्ट फुडमध्ये ३० जुलै व १ ऑगस्ट रोजी रात्री दहा ते साडेदहा वाजण्याच्या दरम्यान घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनस याचे वडिल फिरोज खान हा सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर जवळपास १०० गुन्हे दाखल आहेत. काही दिवसांपूर्वी तो तुरुंगातून जामिनावर सुटून आला होता. त्यानंतर त्याने पुन्हा एकाच्या घरात शिरुन मारहाण करुन खंडणी मागितली होती. त्यामुळे पोलिसांनी त्याला पुन्हा अटक केली आहे. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. रुपेश डाके यांचे राजे चायनिज फास्ट फुड आहे. अनस खान हा ३० जुलै रोजी डाके यांच्या हॉटेलवर आला. त्याने रोज शंभर रुपये खंडणी देण्याची मागणी केली. त्याला फिर्यादी यांनी नकार दिला. यावर त्याने "आब्बा जेलसे बाहेर आने के बाद हररोज पाचसौ रुपये लेके जाऊंगा," असे म्हणून निघून गेला.
यानंतर दुसऱ्या दिवशी तो पुन्हा आला. फिर्यादीला म्हणाला की, "चाचा तुम खयाल रखो. तुमने मुझे परसो पैसे नही दिये, तुमने गलत काम किया, मै तुमको रुपेश नही, रुपेश चाचा बोला हू, अभी मै तुमको दिखाता हू" असे म्हणून फिर्यादीकडे पैशांची मागणी करुन शिवीगाळ करुन दमदाटी केली. लष्कर पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला असून अटक करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक गायकवाड तपास करीत आहेत.