Pune: दिवाळीत मराठवाडा, खान्देश अन् विदर्भासाठी जादा बस; ऑनलाइन बुकिंग सुरु
By अजित घस्ते | Published: October 19, 2023 06:11 PM2023-10-19T18:11:40+5:302023-10-19T18:12:25+5:30
मराठवाडा, खान्देश आणि विदर्भात जाणार्या प्रवाशांची संख्या जास्त आहे...
पुणे : दिवाळीला गावी जाणार्यांची संख्या जास्त असते. त्यामुळे मराठवाडा, खान्देश आणि विदर्भात जाणार्या प्रवाशांसाठी शिवाजीनगर आगारामार्फत जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. या सर्व बस दि. ७ ते ११ नोव्हेंबरपर्यंत पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड, खडकी येथून सोडण्यात येणार असून, प्रवाशांसाठी तिकीट बुकिंग सुरू झाले आहे, त्यामुळे प्रवाशांनी अॅडव्हॅन्स तिकीट बुक करुन सुरक्षित प्रवास करावा, अशी माहिती शिवाजीनगर आगारप्रमुखांकडून देण्यात आली.
दसरा-दिवाळीला पुण्यात नोकरी, उद्योग-व्यवसाय, शिक्षणासाठी आलेले नागरिक मोठ्या संख्येने गावी जातात. यामुळे प्रवासी संख्या जास्त असल्याने जागेअभावी नागरिकांची हाल होते. यामुळे प्रवाशांना त्रास होऊ नये, सुखाचा प्रवास व्हावा यासाठी जादा बसचे नियोजन करण्यात येते. दिवाळीच्या काळात पुण्यातील शिवाजीनगर, स्वारगेट, पुणे स्टेशन या आगारात प्रवाशांची मोठी गर्दी होते. यावेळी राज्य परिवहन विभागाकडून जादा बसचे नियोजन करून अगाऊ तिकीट बुकिंग केले जाते. शिवाजीनगर आगराच्या वतीने मराठवाडा, खान्देश, विदर्भ या ठिकाणी सर्व मार्गांवर प्रवाशांना गावी जाण्यासाठी दि. ७ ते ११ नोव्हेंबर या कालावधीत पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड खडकी येथून सोडण्यात येणार आहेत.
५०० जादा गाड्या...
मराठवाडा, खान्देश आणि विदर्भात जाणार्या प्रवाशांची संख्या जास्त आहे. त्यामुळे प्रवाशांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी एसटी विभागाकडून या ठिकाणावरुन जवळपास ५०० जादा बस सोडण्यात येणार आहेत.