पुण्यातील राजाराम पुलावर टाकला राडारोडा; अधिकाऱ्यांना नाही ठावठिकाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2021 01:50 PM2021-02-22T13:50:58+5:302021-02-22T13:51:38+5:30
नदीपात्रात राडारोडा टाकल्याचा पत्ता न लागणाऱ्या अधिकाऱ्यांना चक्क पुलावर टाकलेल्या राडारोड्याचाही ठावठिकाणा लागलेला नाही.
पुणे : नदीपात्रात राडारोडा कचरा, निर्माल्य टाकण्यासारखे अनेक प्रकार तुम्ही पाहिले असतील. पण आता पुण्यात चक्क नदीतल्या पुलावरच राडारोडा टाकण्याचा प्रकार घडला आहे. नदीपात्रात राडारोडा टाकल्याचा पत्ता न लागणाऱ्या अधिकाऱ्यांना चक्क पुलावर टाकलेल्या राडारोड्याचाही ठावठिकाणा लागलेला नाही.
पुण्यातील राजाराम पुलावर काही अज्ञातांनी सोमवारी (दि. २२) राडारोडा टाकल्याचा प्रकार घडला आहे. हा प्रकार मनसेने उघडकीस आणला आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून हे कृत्य करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई अशी मागणी देखील मनसेने केली आहे. आता महापालिकेचे अधिकारी या प्रकरणाची चौकशी करत आहेत.
याबाबत 'लोकमत'शी बोलताना क्षेत्रीय अधिकारी संतोष वारुळे म्हणाले “ मलाही या संदर्भातील फोटो आणि तक्रार मिळाली आहे. त्यानंतर मी आमच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाठवले आहे. सिसिटिव्ही फुटेज तपासुन कारवाई करण्यात येईल”
स्थानिक भाजप नगरसेवक सुशील मेंगडे म्हणाले ,” जवळच केबल टाकण्याचे काम सुरु आहे. या ठिकाणच्या कंत्राटदाराने हा राडारोडा टाकल्याचे प्रथमदर्शनी दिसते आहे.”