शिवाजीनगर स्थानकात अतिरिक्त रेल्वेमार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 02:15 AM2018-12-13T02:15:53+5:302018-12-13T02:18:06+5:30

शिवाजीनगर रेल्वे स्थानकाचा विस्तार केला जाणार असून त्याअंतर्गत एक अतिरिक्त रेल्वेमार्ग तयार केला जाणार आहे.

Extra railroad at Shivajinagar station | शिवाजीनगर स्थानकात अतिरिक्त रेल्वेमार्ग

शिवाजीनगर स्थानकात अतिरिक्त रेल्वेमार्ग

Next

पुणे : शिवाजीनगर रेल्वे स्थानकाचा विस्तार केला जाणार असून त्याअंतर्गत एक अतिरिक्त रेल्वेमार्ग तयार केला जाणार आहे. तसेच फलाटाची लांबी वाढविणे, स्थानकापर्यंत रस्ता करणे यांसह अन्य सोयीसुविधा करण्याची योजना असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. दरम्यान, या कामांसाठी अतिक्रमण हटविणे आवश्यक असल्याचेही रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले.

पुणे ते लोणावळा मार्गावर शिवाजीनगर स्थानक महत्त्वाचे आहे. या स्थानकावर जवळपास ११ मेल व एक्स्प्रेस गाड्या थांबतात. पण, फलाटांची लांबी कमी असल्याने प्रवाशांना चढताना व उतरताना त्रास होतो. त्यामुळे या फलाटांची लांबी वाढविणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने रेल्वेकडून काम सुरू केले आहे. तसेच, परिसराचाही विकास करण्याचे प्रस्तावित आहे.

पुढील काळात मेट्रो, रेल्वे व बस सेवा एकमेकांना जोडण्याची योजना आहे. त्यासाठी अतिरिक्त जागा लागणार आहे. स्थानकात अतिरिक्त रेल्वेमार्गही टाकला जाणार आहे. त्यामुळे या ठिकाणाहून लोकल सेवा सुरू होणे शक्य असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. मात्र, सध्या अतिक्रमणामुळे ही कामे करता येत नाहीत. त्यामुळे परिसरातील अतिक्रमण हटविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्वांना जागा सोडण्याची नोटीस दिली असल्याचे रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

शिवाजीनगर स्थानकाबरोबरच इतर स्थानकांवरही प्रवाशांसाठी सुविधा वाढविण्याचे काम सुरू आहे. दापोडी, पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, देहूरोड, तळेगाव, वडगाव व मळवली या स्थानकांवरील फलाटांची लांबी वाढविली जाणार आहे. त्यासाठी १४ कोटी ५० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. दापोडी, पिंपरी, चिंचवड, तळेगाव, वडगाव स्थानकांवर हे काम सुरू केले आहे.

Web Title: Extra railroad at Shivajinagar station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.