अतिवृष्टी झाली, तर १७ गावांना धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:10 AM2021-07-28T04:10:23+5:302021-07-28T04:10:23+5:30
(स्टार ९७४ डमी) पुणे : अतिवृष्टी झाल्यास जिल्ह्यातील काही तालुक्यांतील ठरावीक पर्यटनस्थळ आणि १७ दरडप्रवण गावांना धोका निर्माण ...
(स्टार ९७४ डमी)
पुणे : अतिवृष्टी झाल्यास जिल्ह्यातील काही तालुक्यांतील ठरावीक पर्यटनस्थळ आणि १७ दरडप्रवण गावांना धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पर्यटकांना अशा ठिकाणी जाताना काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच मावळ, मुळशी, भोर, आंबेगाव, खेड आणि जुन्नर तालुक्यांतील १७ गावे दरडप्रवण म्हणून शासनाने घोषित केली आहेत. अतिवृष्टी झाल्यास या गावांना धोका निर्माण होऊ शकतो.
माळीण गावाच्या दुर्घटनेनंतर राज्य शासनाने राज्यातील धोकादायक किंवा दरडप्रवण गावांची यादी जाहीर केली आहे. तसेच या गावांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, या गावातील लोक गाव सोडायला तयार नाहीत. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील या गावांचा पुनर्वसनाचा प्रश्नदेखील अद्यापही प्रलंबित आहे.
-----
* जिल्ह्यातील दरडप्रवण धोकादायक असलेली गावे
मावळ तालुक्यातील भुशी, बोरज, ताजे, गबालेवाडी, मोरमारेवाडी, माऊ, तुंग, मालेवाडी आणि लोहगड, तर भोर तालुक्यातील कोर्ले-जांभुळवाडी, पांगारी-सोनारवाडी, धानवली आणि हेडेन, आंबेगाव तालुक्यातील पसारवाडी, मुळशी तालुक्यातील घुटके, खेड तालुक्यातील भोमाळे आणि जुन्नर तालुक्यातील तळमाची वाडी.
-----
* जिल्ह्यातील पुराचे पाणी साचणारी ठिकाणे
पुणे जिल्ह्यात देहू, आळंदी, राजगुरूनगर, शेलपिंपळगाव, डोंगरगाव, पिंपरी सांडस, मांजरी, थेऊर, शिरूर आदी गावांमध्ये अतिवृष्टी झाल्यास पुराचे पाणी आतमध्ये शिरू शकते. त्यामुळे या गावातील अतिक्रमणे काढून नदीच्या पाण्याचा प्रवाह मोकळा करणे गरजेचे आहे. अन्यथा पूरपरिस्थिती आणखी धोकादायक बनू शकते.
-----
* पाणी साचण्याची कारणे
या नदीकाठच्या गावांमध्ये मुख्यत: अतिक्रमण हा मुख्य मुद्दा आहे. अतिक्रमणामुळे पाण्याचा प्रवाहाला अडथळा निर्माण होत आहे. तसेच भीमा, भामा, इंद्रायणी, पवना, घोड नदी, मुळा, मुठा या नद्यांवर उभारलेल्या पुलांची उंची मर्यादित असल्यामुळे पुराच्या पाण्याच्या प्रवाहाला अडथळा होत आहे. पुराचे पाणी वेगाने जात नाही. त्यामुळे हे पाणी आजूबाजूच्या गावांमध्ये पाणी शिरत आहे.
-----
* पाऊस नको नकोसा !
१) आमचे गाव दरडप्रवण म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात आम्हाला भीतीच्या छायेखालीच राहावे लागत आहे. अतिवृष्टी झाल्यास आमच्या गावाला धोका आहे. भविष्यात धोकादायक घटना होऊ नये, यासाठी शासनाने गावांचा पुनर्वसनासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.
- एक नागरिक, मोरमारेवाडी