Pooja Chavan Suicide Case : आत्महत्या केलेल्या तरुणीच्या लॅपटॉप व मोबाईलमध्ये खळबळजनक माहिती; चंद्रकांत पाटलांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2021 08:21 PM2021-02-11T20:21:51+5:302021-02-11T20:22:58+5:30
Pooja Chavan Suicide Case : पूजा चव्हाण या २२ वर्षीय तरुणीच्या आत्महत्येचा आणि विदर्भातल्या एका मंत्र्याचा संबंध असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु...
पुणे : पुण्यामध्ये रविवारी एका २२ वर्षीय तरुण मुलीनी आत्महत्या केली होती. या प्रकरणी महाविकास आघाडीतल्या एका मंत्र्याचा थेट संबंध असल्याचा आरोप आता होतो आहे. मंत्र्याशी संबंधित आत्महत्या प्रकरणातल्या तरुणीच्या लॅपटॉपमध्ये अत्यंत खळबळजनक माहिती असल्याचा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी 'लोकमत'शी केला आहे.
पुण्यातील महंमदवाडी परिसरातल्या हेवन पार्क सोसायटीत राहणाऱ्या पूजा चव्हाण या २२ वर्षीय तरुणीने रविवारी मध्यरात्री तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारत आत्महत्या केली. मात्र पूजेच्या आत्महत्येचा आणि विदर्भातल्या एका मंत्र्याचा संबंध असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली. राज्य सरकारमधील 'त्या' कथित मंत्र्यासोबतच्या प्रेमसंबंधात निर्माण झालेल्या तणावातूनच या तरुणीने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी भाजपने उचलून धरली आहे. आत्महत्या केलेल्या मुलीची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.
चंद्रकांत पाटील यांनी मंत्र्याचे नाव घेण्याचे टाळतानाच आत्महत्या केलेल्या तरुणीच्या लॅपटॉप व मोबाईल मध्ये असलेली माहिती पोलिसांनी जाहीर करावी. अन्यथा दोन तीन दिवसांमध्ये ती लोकांसमोर येईलच असे म्हणाले आहे. हे संपूर्ण प्रकरण भयानक असून यासंबंधी पोलिसांनीच ही माहिती जाहीर करावी अशी मागणीही पाटील यांनी केली आहे.
यावेळी धनंजय मुंडे यांचे प्रकरण देखील दाबले गेले असल्याचा दावा करताना तरुणीच्या आत्महत्या प्रकरणातली माहिती मात्र बाहेर येईलच असे स्पष्टपणे सांगितले आहे. या संपूर्ण प्रकरणात पवारांकडून आपली अपेक्षा असल्याचंही म्हणत पवार गप्प का असा सवालही त्यानी उपस्थित केला आहे. “ रेणु आणि करुणा शर्मा प्रकरणात थेट तक्रार आणि कबुली दिल्यावरही पुढे काही त्याचे झाले नाही. त्याबरोबरच आता या प्रकरणातही काही होत नाही. पवार नेकीने वागणारे नेते आहेत. ते गप्प का? त्यांच्याकडुन आमची अपेक्षा आहे “ असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
या सरकार मधल्या अनेक मंत्र्याच्या बाबतीत वेगवेगळ्या गुन्ह्यांच्या बाबतीत केसेस आहेत. याबरोबरच हे सरकार थेट जनतेमधुन निवडुन आलेले आहे ते जनतेला उत्तरदायी नसल्याचाही आरोप पाटील यांनी केला आहे.