लक्ष लक्ष नेत्रांनी अनुभवला बीजसोहळा
By admin | Published: March 26, 2016 03:06 AM2016-03-26T03:06:29+5:302016-03-26T03:06:29+5:30
इंद्रायणीतीरी वैकुंठस्थानी माध्यान्ही टाळ-मृदंगाचा कल्लोळ अन् वीणा झंकारली. ‘तुकाराम-तुकाराम’चा जयघोष झाला. नांदुरकीच्या झाडावर लाखो वैष्णवांनी बेल-लाह्या फुलांची
श्रीक्षेत्र देहूगाव : इंद्रायणीतीरी वैकुंठस्थानी माध्यान्ही टाळ-मृदंगाचा कल्लोळ अन् वीणा झंकारली. ‘तुकाराम-तुकाराम’चा जयघोष झाला. नांदुरकीच्या झाडावर लाखो वैष्णवांनी बेल-लाह्या फुलांची उधळण केली. भक्तिमय वातावरणात शुक्रवारी
लक्ष-लक्ष नेत्रांनी जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराममहाराजांचा ३६७वा बीजसोहळा अनुभवला. वैष्णवांच्या महासागराने ‘तुका आकाशाएवढा’चे दर्शन घडले. ‘धरिल्या देहाचे सार्थक करीन। आनंदे भरीन तिन्ही लोक ॥१॥’ याची अनुभूती देहूनगरीत आली.
अखंडपणे सुरू असणारा हरिनामाचा जयघोष, भजन, कीर्तनांनी तुकोबारायांची देहूनगरी भक्तिमय झाली होती. इंद्रायणीतीरी भक्तिसागर लोटला होता. राज्यात दुष्काळाची पार्श्वभूमी असतानाही बीजसोहळ्याचा उत्साह तसूभरही कमी झाला नव्हता. दर वर्षीपेक्षा गर्दी अधिक जाणवली. बीजसोहळा अनुभवण्यासाठी वारकरी आतूर झाल्याचे दिसत होते. तत्पूर्वी पहाटे तीनला काकडारती झाली. त्यानंतर संत तुकाराममहाराज संस्थानचे अध्यक्ष शांताराम मोरे, विश्वस्त अशोक निवृत्ती मोरे यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात महापूजा झाली. या वेळी विश्वस्त जालिंदर मोरे, सुनील मोरे उपस्थित होते. त्यानंतर सुनील दिगंबर मोरे, सुनील दामोदर मोरे, अभिजित मोरे यांच्या हस्ते शिळा मंदिरात महापूजा झाली. वैकुंठगमन मंदिरात मनीष आगरवाल, अभिजित मोरे, सुनील मोरे यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली.
महापूजेनंतर मुख्य मंदिर, शिळा मंदिर व वैकुंठगमन मंदिरातील दर्शनबारी सुरू करण्यात आली. इंद्रायणीस्नान करून भाविक दर्शनासाठी जाताना दिसत होते. इंद्रायणीच्या दोन्ही तीरावर हरिनामाचा गजर सुरू होता.
मुख्य मंदिरातून सकाळी साडेदहाच्या सुमारास तुकोबारायांच्या पादुका पालखीत ठेवण्यात आल्या. प्रकाश टिळेकर, नामदेव भिंगारदिवे, लक्ष्मण पवार, गुंडा कांबळे, बाळासाहेब चव्हाण यांनी पालखी खांद्यावर घेतली. शंखनाद करण्यात आला. भैयासाहेब कारके यांनी चौरी ढाळली. पोपट तांबे यांची तुतारी वाजली. रियाझ मुलाणींचा ताशा कडाडला. संबळाने ताल धरला, पिराजी पांडे, मंगेश पांडे यांनी चौघडा वाजविला. टाळ-मृदंगाचा गजर करीत पालखी सोहळा वैकुंठस्थानाकडे निघाला. अब्दागिरी, चौरी, गरुडटक्के घेऊन विविध मानकऱ्यांसह कल्याणचे अप्पामहाराज लेले दिंडीसोहळ्यात सहभागी झाले होते. पद्माकर लेले दिंडीचे संचलन करीत होते.
या प्रसंगी पिंपरी-चिंचवडचे आयुक्त राजीव जाधव, हवेलीच्या प्रांत स्नेहल बर्गे, पिंपरी-चिंचवडचे अप्पर तहसीलदार किरणकुमार काकडे, गटविकास अधिकारी संदीप कोहिनकर, हवेली पंचायत समितीचे प्रभारी सभापती नितीन दांगट, पंचायत समिती सदस्य सुहास गोलांडे, सरपंच हेमा मोरे आदी मान्यवर उपस्थित होते. त्यानंतर दुपारी साडेबारला पालखी पुन्हा मुख्य मंदिराकडे मार्गस्थ झाली. सोहळ्यानिमित्त देहूत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. वाहतुकीचेही नियोजन केले होते.
भाविकांची झुंबड : पोलिसांची तारांबळ
बीजोत्सव सोहळ्यानंतर येथील मंदिरात दर्शनासाठी एकच झुंबड उडाली आणि ही गर्दी नियंत्रित करण्यासाठी पोलिसांची तारांबळ उडाली. या वेळी येथील मंदिराचे दार अचानक बंद झाल्याने एक महिला जखम झाली. तिला तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
बीजोत्सव यात्रेचे प्रथमच सीसी कॅमेऱ्यांमार्फत चित्रीकरण करून सुरक्षिततेचे एक पाऊल पुढे टाकले. यासाठी येथील युवा उद्योजक विजय भसे यांनी तीन सीसीकॅमेरे व मॉनिटर व संबंधित लागणारे साहित्य देहूगाव ग्रामपंचायतीला भेट दिला असून, ते काल कार्यान्वित करण्यात आले. यामुळे पोलिसांना या छुप्या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून यात्रेवर नियंत्रण ठेवण्यास मदतच झाली आहे. यासाठी गतवर्षी पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांनी छुपे कॅमेरे बसविण्याचे आवाहन केले होते.
मानकऱ्यांचा गौरव
या वेळी उपस्थित भाविकांनी महाराजांचे सदेह वैकुंठगमन प्रसंगाचे चित्र डोळ्यांसमोर ठेवून, ‘आम्ही जातो आमच्या गावा। आमुचा रामराम घ्यावा ।।’ या अभंगाचे गायन करीत श्री संत तुकाराममहाराजांना मनोभावे अभिवादन केले. येथील मुख्य कार्यक्रम संपल्यानंतर,पालखी पुन्हा मुख्य मंदिराकडे रवाना झाली आणि त्याच वेळी उपस्थित भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले. देवस्थानच्या वतीने मुख्य मंदिरात प्रथेप्रमाणे उपस्थित दिंडीकरी, फडकरी, मानकरी यांना मानाचे फेटे व नारळ प्रसाद देऊन सन्मानित केले.
परतीच्या मार्गावर गर्दी
वैकुंठस्थानावर सकाळी दहाला श्री संत तुकाराममहाराजांचे अकरावे वंशज, देहूकर फडाचे प्रमुख बाळासाहेब ऊर्फ ज्ञानेश्वरमहाराज मोरे यांचे ‘घोटवीन लाळ, ब्रह्मज्ञानी हाती।’ यावर कीर्तन सुरू झाले. वैकुंठस्थानापासून ते पुलापर्यंतच्या रस्त्यावर वारकरी जागा धरून बसू लागले होते. साडेअकरा वाजण्याच्या सुमारास वैकुंठगमन मंदिराच्या आवारातील नांदुरकीच्या झाडाखाली आली. बीजसोहळ्याची वेळ जशी समीप येऊ लागली, तसा परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला.
वातावरण ढगाळ असले, तरी कमालीचा उकाडा जाणवत होता. तरीही वारकऱ्यांना आस सोहळ्याची लागली होती. सूर्य माध्यान्ही आला आणि टाळ-मृदंगाचा एकच गजर झाला. ‘तुकाराम-तुकाराम’ जयघोषाने आसमंत दणाणला. नांदुरकीच्या वृक्षाच्या दिशेने लाखो वैष्णवांनी फुलांची उधळण केली. लक्ष-लक्ष नेत्रांनी बीजसोहळा अनुभवला. कीर्तन संपल्यानंतर खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते महाआरती झाली.