ऑनलाईन शिक्षण अन् मोबाईलमुळे मुलांमध्ये डोळ्यांच्या तक्रारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:08 AM2021-07-16T04:08:59+5:302021-07-16T04:08:59+5:30
पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर लहान मुले आणि युवकांच्या डोळ्यांच्या समस्येत वाढ झाल्याचे दिसत आहे. शाळा आणि महाविद्यालयीन मुलांचे ...
पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर लहान मुले आणि युवकांच्या डोळ्यांच्या समस्येत वाढ झाल्याचे दिसत आहे. शाळा आणि महाविद्यालयीन मुलांचे गेल्या दीड वर्षापासून ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. चार-पाच तास शाळेसाठी स्क्रीनसमोर बसल्यानंतर दिवसभरात पुन्हा टीव्ही पाहणे, मोबाईलवर गेम खेळणे यामुळे स्क्रीन टाईममध्ये अजूनच भर पडते. त्यामुळे मुलांमध्ये आणि युवकांमध्ये डोळ्यांशी संबंधित तक्रारी वाढल्या आहेत. त्यांच्यामध्ये चष्मा लागण्याच्या तक्रारीही वाढल्या आहेत.
कोरोनाचे अनेक सामाजिक, आर्थिक परिणाम जाणवत असताना आरोग्याची संबंधित अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. ‘ऑनलाईन स्कूल’मुळे मुलांच्या आणि ‘वर्क फ्रॉम होम’मुळे मोठ्यांच्या डोळ्यांवर कमालीचा ताण निर्माण होत आहे. डोळ्यांना खाज सुटणे, सातत्याने पाणी येणे, डोळे लाल होणे, चष्मा नव्याने लागणे किंवा पहिल्यापासून असल्यास नंबर वाढणे अशा तक्रारी ऐकायला मिळत आहेत. मायोपिया अर्थात अंधूक दिसण्याची समस्या असलेल्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे.
मोबाईल किंवा गॅझेटचा जास्त वापर केल्याने जवळच्या वस्तू सहज दिसतात. परंतु, दूरचे दिसत नाही, अशा समस्या सध्या वाढू लागल्या आहेत. मायोपिया असलेल्या व्यक्तीला जवळ असलेल्या वस्तू नीट दिसतात. परंतु दूरच्या वस्तू पाहण्यात अडचण येते. डोळ्याचे स्नायू कमकुवत होण्यामुळे देखील मायोपिया होऊ शकतो. एखाद्याच्या डोळ्याच्या आकारामुळे हलकी किरणे चुकीच्या पद्धतीने वाकणे आणि आपल्या डोळ्यातील पडद्यात दोष निर्माण झाल्यास समोरील वस्तू न दिसण्याची समस्या उद्भवू शकते. याशिवाय सतत कॉम्प्युटरवर काम करत राहिल्यावरही धूसर दिसायला लागते.
----------------------
डोळ्यांना त्रास होऊ नये म्हणून
१) अँटिग्लेयर चष्मा वापरावा.
२) संगणक स्क्रीनवर अँटिग्लेयर ग्लास बसवावी.
३) प्रत्येक आॅनलाईन तासिकेनंतर डोळे बंद ठेवून डोळ्यांना थोडा आराम द्यावा.
४) जीवनसत्त्वयुक्त आहार, नियमित व्यायाम आणि मोबाइल फोनचा मर्यादित वापर यामुळे डोळ्यांची समस्या दूर होऊ शकते.
५) डोळ्यांची वेळोवेळी तपासणी करणेही आवश्यक असते.
६) मोठ्यांसह लहान मुलांनी गॅझेटचा वापर किती करावा, हे ठरवून घेतले पाहिजे. यासाठी वेळेचे नियोजन करा.
७) नियमित शारीरिक व्यायाम करावे. यासाठी धावणे, चालणे आणि योगा करणे फायदेशीर ठरू शकते. नियमित नेत्र तपासणीसाठी, योग्य चष्मा किंवा लेन्सची निवड महत्त्वाची ठरते.
--------------------------
लहान मुलांमध्ये डोकेदुखी वाढली
संगणक आणि मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांमध्ये डोकेदुखी, डोळ्यांतून पाणी येणे असे प्रकार वाढत आहेत. अशा वेळी पालक मुलांना पटकन आराम मिळावा यासाठी घरात उपलब्ध असलेले ड्रॉप वापरतात किंवा मेडिकल स्टोअरमधून आणलेली औषधे मुलांना देतात. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अशा प्रकारे उपचार घेणे धोकादायक ठरू शकते.
- डॉ. जीवन साळुंखे, नेत्ररोगतज्ज्ञ
-------------
ऑनलाईन शिक्षणामुळे मुलांमध्ये कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम वाढीस लागला आहे. डोळ्यांच्या अनेक तक्रारींना आमंत्रण मिळत आहे. डोळ्यांवर ताण येऊ नये, यासाठी स्क्रीनसमोर असताना दर २० मिनिटांनी २० सेकंद डोळे मिटावेत. भरपूर पाणी प्यावे, त्यामुळे डोळ्यांमध्ये कोरडेपणा येत नाही. कॉम्प्युटर डोळ्यांपेक्षा जास्त उंचीवर न ठेवता, डोळ्यांच्या समान उंचीवर किंवा थोडा खाली ठेवावा. डोळ्यांची तपासणी वेळोवेळी करून घ्यावी.
- डॉ. वंदना सिरसीकर, नेत्रविभाग प्रमुख, औंध जिल्हा रुग्णालय