ऍडिनो व्हायरसमुळे डोळ्यांची साथ; आरोग्य संचालकांचा दावा, आळंदीत साथीचे अनेक रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2023 10:51 AM2023-07-26T10:51:37+5:302023-07-26T10:51:48+5:30

सर्व आरोग्य संस्थांमध्ये या आजाराच्या उपचारासाठी लागणारी आवश्यक औषथे उपलब्ध राहणार

Eye infections due to adenovirus Health director claims many patients of epidemic in Alanti | ऍडिनो व्हायरसमुळे डोळ्यांची साथ; आरोग्य संचालकांचा दावा, आळंदीत साथीचे अनेक रुग्ण

ऍडिनो व्हायरसमुळे डोळ्यांची साथ; आरोग्य संचालकांचा दावा, आळंदीत साथीचे अनेक रुग्ण

googlenewsNext

पुणे: ऍडिनो व्हायरसमुळे डोळ्यांचा विषाणूजन्य संसर्ग होण्याच्या (डोळे येणे) प्रकारात वाढ झाली असून, त्यासाठी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन राज्याचे आरोग्य संचालक डॉ. नितीन आंबडेकर यांनी केले आहे.

सध्या पुणे जिल्ह्यातील आळंदी भागात तसेच विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यात डोळे आलेले अनेक रुग्ण आढळून येत आहेत. डोळ्यांचा विषाणूजन्य संसर्ग हा सौम्य प्रकारचा संसर्ग असला तरीदेखील याबाबत सार्वजनिक आरोग्य विभाग आणि नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे, असे आदेश आरोग्य संचालक डॉ. नितीन आंबडेकर यांनी राज्यातील सर्व जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांना काढले आहेत. राज्यातील अनेक भागात उन्हाळा किंवा पावसाळ्यात डोळे येण्याची विषाणूजन्य साथ सुरू होते. डोळ्याचा विषाणूजन्य संसर्ग हा मुख्यत्वे ऍडिनो व्हायरसमुळे होतो, असे म्हटले आहे.

सर्वेक्षण करा

ज्या भागात डोळे येण्याची साथ सुरू आहे किंवा मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळून येत आहेत त्या भागात आरोग्य सेवकांच्या मदतीने घरोघर भेटी देऊन सर्वेक्षण करा. या भागात पावसामुळे चिकचिक, घरगुती माशा किवा चिलटांचा प्रादुर्भाव असेल तर परिसर स्वच्छता आणि आवश्यक उपाययोजना कराव्यात.

नियमित हात धुवा

डोळे आलेल्या रुग्णांमध्ये डोळा लाल होणे, वारंवार पाणी गळणे, डोळ्याला सूज येणे अशी लक्षणे आढळतात. या व्यक्तींनी आपला जनसंपर्क कमी करायला हवा तसेच नियमित हात धुणे आवश्यक आहे. एकापासून दुसऱ्या व्यक्तीला हा संसर्ग वेगाने होतो, त्यामुळे नियमित हात धुणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य उपचार घेणे गरजेचे आहे.

तर मुलांना वेगळे ठेवा

शाळा, वसतिगृहे, अनाथालय अशा संस्थात्मक ठिकाणी जर अशी साथ आली असेल तर डोळे आलेल्या मुलाला किंवा व्यक्तीला वेगळे ठेवण्याची गरज आहे. डोळ्यांचा हा संसर्ग सौम्य स्वरूपाचा असला तरी यामध्ये वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी जनजागृती करण्यात यावी. सर्व आरोग्य संस्थांमध्ये या आजाराच्या उपचारासाठी लागणारी आवश्यक औषथे उपलब्ध राहतील, याची खातरजमा करावी असे आदेशात म्हटले आहे.

Web Title: Eye infections due to adenovirus Health director claims many patients of epidemic in Alanti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.