महापालिकेच्या नऊ दवाखान्यांत आता नेत्रसेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 03:07 AM2018-09-26T03:07:27+5:302018-09-26T03:07:42+5:30
पुणे शहरातील सर्वसामान्य नागरिकांना नेत्रतपासणी व नेत्रसेवा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेच्या वतीने बी. जे. मेडिकल कॉलेज व ससून सर्वोपचार रुग्णालयच्या मदतीने नऊ दवाखान्यांमध्ये नेत्रसेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
पुणे - शहरातील सर्वसामान्य नागरिकांना नेत्रतपासणी व नेत्रसेवा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेच्या वतीने बी. जे. मेडिकल कॉलेज व ससून सर्वोपचार रुग्णालयच्या मदतीने नऊ दवाखान्यांमध्ये नेत्रसेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या प्रस्तावाला मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
पुणे महापालिकेच्या सहा दवाखान्यांमध्ये नेत्रतपासणी करण्यात येते. याशिवाय कमला नेहरू रुग्णालय-मंगळवार पेठ, मुकुंदराव लेले दवाखाना-शनिवार पेठ या दवाखान्यांमध्ये दोन ठिकाणी डोळ्यांची तपासणी व वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहेत. पुणे शहरातील जास्तीत जास्त
नागरिकांना नेत्रसेवेचा लाभ मिळण्यासाठी पुणे महापालिकेच्या शहरातील नऊ दवाखान्यांमध्ये
पुढील पाच वर्षांकरिता बी. जे. मेडिकल कॉलेज, ससून सर्वोपचार रुग्णालय येथील नेत्रतज्ज्ञांमार्फत रुग्णांची नेत्रतपासणी करण्यात
येणार आहे.
ज्या रुग्णांना नेत्र शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे अशा रुग्णांची ससून सर्वाेपचार रुग्णालयात
मोफत नेत्र शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. याबाबत पुणे महापालिका व बी. जे. मेडिकल कॉलेज यांच्यामध्ये करार करण्यास स्थायी समितीने मान्यता दिली असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक यांनी या प्रसंगी दिली.
४०० रुपयांत डायलेसिस
महापालिकेच्या वानवडी येथील नामदेव गेनूजी शिवरकर दवाखान्यात ४०० रुपये इतक्या अल्प दरात डायलेसिसची सुविधा देण्यासाठी श्री गुरु गौतम मुनी मेडिकल अॅण्ड चॅरिटेबल टॅस्ट या संस्थेला मान्यता देण्यात आली आहे.
मंगळवार पेठेतील कमला नेहरू रुग्णालय आणि येरवड्यातील राजीव गांधी रुग्णालयात ही सेवा सुरू आहे.