‘नेत्रवारी’साठी फेसबुक दिंडी सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2018 08:57 PM2018-07-04T20:57:33+5:302018-07-04T21:08:07+5:30
‘आम्ही नेत्रदान करणार, तुम्हीही करा. चला नेत्रवारीमध्ये सहभागी होऊ या..’ असे ब्रीदवाक्य सोबत घेऊन फेसबुक दिंडी टीमने उत्साहात या अभियानाला प्रारंभ केला आहे.
बारामती : आठ वर्षांपासून नेटकऱ्यांना पालखी सोहळ्याचा जिवंत अनुभव देणाऱ्या फेसबुक दिंडी यावर्षी ‘नेत्रवारी’ अभियान राबविण्यास सज्ज झाली आहे. फेसबुकच्या माध्यमातून मरणोत्तर नेत्रदानासाठी फेसबुक दिंडीच्या टीमने नेटकऱ्यांना आवाहन केले आहे.
यावर्षी फेसबुक दिंडीचे हे ८वे वर्ष आहे. फेसबुक दिंडी टीमने व्यंकटेश परिवार, औरंगाबाद या अंध बांधवांसाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थेच्या सहकार्याने ‘नेत्रवारी’ अभियानास प्रारंभ केला आहे. ‘आम्ही नेत्रदान करणार, तुम्हीही करा. चला नेत्रवारीमध्ये सहभागी होऊ या..’ असे ब्रीदवाक्य सोबत घेऊन फेसबुक दिंडी टीमने उत्साहात या अभियानाला प्रारंभ केला आहे. पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्राच्या वैभवशाली सांस्कृतिक इतिहासचे दर्शन घडविणारी एक महान परंपरा. या वारी परंपरेने महाराष्ट्राच्या सर्व जाती-धर्मांना, पंथांना सामावून घेतले. महाराष्ट्राच्या सामाजिक एकात्मतेच दर्शन घडवणारी वारी ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवण्यासारखे दुसरे सुख नाही. ‘पंढरीच्या वारीचा हा अनुपम्य सुखसोहळा पाहीन मी याचि देही याचि डोळा’ असे म्हणत आजही लाखो वारकरी आपल्या सावळ्या विठुरायाचे गोजिरे रूप पाहण्यासाठी वारीत पंढरपूरपर्यंत पायी जातात.
परंतु, आजही समाजातील एक घटक हा सुखसोहळा पाहण्यापासून वंचित आहे. समाजातील अंध बांधवांना दृष्टीसुख मिळावे; त्यांनीही हा अनुपम सुखसोहळा याचि डोळा अनुभवावा, या भावनेतून ‘नेत्रवारी’ अभियानाची संकल्पना उदयास आली, अशी माहिती स्वप्निल मोरे यांनी दिली. फेसबुक दिंडीच्या अॅपवर नेत्रदानाचे फॉर्म उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ‘रंगविशेष’ टीमने फेसबुक दिंडीच्या या उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी व लोकांना नेत्रदानाचे भावनिक आवाहन करणारा ‘नेत्रवारी’ नावाचा लघुपटही बनवला आहे. या लघुपटाचे लेखन व दिग्दर्शन सुमंत धस यांनी केले आहे.
२०१६मध्ये फेसबुक दिंडी टीमने राबविलेल्या ‘पाणी वाचवा’ या जलसंधारणाच्या मोहिमेला लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला. तसेच गतवर्षी वारी ‘ती’ची या उपक्रमालाही चांगला प्रतिसाद मिळाला होता. फेसबुक दिंडीच्या यावर्षीच्या ‘नेत्रवारी’ मोहिमेला देखील भरभरून प्रतिसाद मिळेल, असा विश्वास स्वप्निल मोरे, मंगेश मोरे, अमित कुलकर्णी, सूरज दिघे, राहुल बुलबुले, अमोल निंबाळकर, ओंकार मरकळे, सुमीत चव्हाण, ओंकार महामुनी यांनी व्यक्त केला आहे.