फेसबुक मैत्रीतून २२ लाखांना गंडा, ६२ वर्षांच्या महिलेला तब्बल ५ महिने फसविले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2018 11:01 PM2018-03-12T23:01:23+5:302018-03-12T23:01:23+5:30
फेसबुकच्या माध्यमातून आपण जगातील कोणाशीही मैत्री करू शकतो़ पण, अनेकदा या सोशल मिडियामध्ये समोरच्या व्यक्तीविषयी नेमकी माहिती नसतानाही आपण त्यांच्यावर विश्वास ठेवतो आणि त्याचा गैरफायदा गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक घेताना दिसून येत असून ते अशांना आपल्या जाळ्यात पकडून पुरेपुर लुटत असतात.
पुणे : फेसबुकच्या माध्यमातून आपण जगातील कोणाशीही मैत्री करू शकतो़ पण, अनेकदा या सोशल मिडियामध्ये समोरच्या व्यक्तीविषयी नेमकी माहिती नसतानाही आपण त्यांच्यावर विश्वास ठेवतो आणि त्याचा गैरफायदा गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक घेताना दिसून येत असून ते अशांना आपल्या जाळ्यात पकडून पुरेपुर लुटत असतात. त्याचा प्रत्यय पुण्यातील एका ६२ वर्षाच्या महिलेला आला.
फेसबुकच्या माध्यमातून मैत्री करुन भारतात आल्यावर कस्टमने पकडल्याची बतावणी करुन या महिलेला तब्बल २२ लाख ५२ हजार रुपयांना गंडा घातला आहे. जवळपास पाच महिने वेगवेगळी कारणे सांगून त्याने ही महिला आणि तिच्या मुलाचा विश्वास संपादन करुन ही रक्कम लाटली आहे़ विशेष म्हणजे या महिलेने आपले मित्र, नातेवाईकाकडून पैसे घेऊन त्यांनी सांगितलेल्या बँक खात्यात वेळोवेळी पैसे भरत गेले़ शेवटी आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी हडपसर पोलिसांकडे धाव घेतली.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, हडपसरमधील वैदुवाडी येथे राहणा-या एका ६२ वर्षाच्या महिलेने फिर्याद दिली आहे. तिची फेसबुकवर बेरी ग्रिफीन या नावाने अकाऊंटधारक असलेल्यांशी मैत्री झाली़ त्याने आपण इंग्लडमधील लिव्हरपुल येथे अनाथाश्रम चालवत असून सामाजिक कार्यासाठी भारतात येत आहे. त्यानंतर त्याने १५ सप्टेंबर २०१७ रोजी आपल्याला परकीय चलन बाळगल्याप्रकरणी कस्टम अधिका-यांनी पकडले असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांच्याशी एक महिला बोलली व त्यांना सोडण्यासाठी ४५ हजार रुपये भरावे लागतील, असे सांगितले. त्यानुसार त्यांनी दिलेल्या बँक खात्यात त्यांनी पैसे भरले. त्यानंतर बेरी यांचा फोन आला व आपले भारतात कोणी ओळखीचे नाही अजून १ लाख १२ हजार रुपये भरावे लागणार असल्याचे सांगितले. त्यासाठी भगतसिंग नावाने बँक खात्यात पैसे भरायला सांगितले. त्यानुसार त्यांनी मित्र व नातेवाईकांकडून पैसे घेऊन बँकेत पैसे भरले़ त्यानंतर बेरी यांच्या नावाने त्यांना एक ई मेल आला. त्याला रिझर्व्ह बँकेची लिंक होती. त्यांनी ती पाहिल्यावर बेरी यांच्या खात्यात २२ लाख ८५ हजार रुपये असून ते रिलिज करायचे असेल तर, २ लाख ३८ हजार रुपये भरावे लागतील, असे त्यात म्हटले होते. त्यांनी ही माहिती त्यांच्या मुलाला सांगितली़ त्यानंतर त्यांना रिझर्व्ह बँकेतून अधिकारी बोलत असल्याचे सांगत फोन आला. त्यावर त्यांच्या मुलानेही विश्वास ठेवून त्याने दिलेल्या बँक खात्यात पैसे भरले. माझे पैसे रिलिज झाले की तुमचे सर्व पैसे देतो, असे सांगून त्यानंतर वेगवेगळी कारणे सांगून त्याने ही महिला व तिच्या मुलाकडून तब्बल २२ लाख ५२ हजार २८५ रुपये दिले. त्यानंतर त्याचा मोबाईल बंद झाल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी हडपसर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.