फेसबुकमित्राच्या प्रेमापोटी ९ लाख गमावण्याची वेळ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2019 06:18 AM2019-06-10T06:18:30+5:302019-06-10T06:18:52+5:30
पुण्यातील प्रकार : तक्रार दाखल
पुणे : फेसबुकवरून झालेल्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले़ तिला लग्नाचे आमिष दाखविले़ त्यातून ती त्याच्या पूर्णपणे आहारी गेली़ ट्रेनी डॉक्टर तरुणीला फेसबुकवरून प्रेमात गुंतवून ९ लाख १७ हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. २५ वर्षांच्या तरुणीने अलंकार पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ वर्षांची तरुणी पुण्यातील एका नामांकित रुग्णालयामध्ये ट्रेनी डॉक्टर म्हणून काम करते. तिला तिच्या जुन्या महाविद्यालयातील मैत्रीण रुख्साना नबी हिने फेसबुकवरून संपर्क करत हर्षा चेरुकुरी हा तरुण तुला कशासाठी फॉलो करीत आहे, असे विचारत तिचा मोबाईल क्रमांक मिळवला. त्यानंतर ९ एप्रिल व १८ मे रोजी तरुणीला हर्षा चेरुकुरी या तरुणाचा व्हॉट्स अॅप मेसेज आला. त्याने तिच्यावर प्रेम करीत असल्याचे सांगितले. तरुणीने त्याला होकार दिला.
हर्षा याने वेळोवळी सामाजिक कामासाठी पैसे लागत असल्याचे भासवत विविध संस्था, तसेच खात्यांवर पैसे पाठविण्यास तरुणीला सांगितले. २२ मे ते ६ जून या कालावधीत त्याने ९ लाख १७ हजार रुपये उकळले. ६ जूनला तिने तिचे फेसबुक अकाउंट चेक केले असता काही लोक ब्लॉक केले असल्याचे तिच्या लक्षात आले. एका अकाउंटवर हर्षा चेरुकुरी नावाने एक फेक अकाऊंट असून त्याद्वारे तरुणींना फसविले जात असल्याचे लिहिले होते. त्याचे नाव वामसी मनोहर जोगाडा असल्याचे, तसेच त्याला टू टाऊन पोलीस स्टेशन, काकीनाडा पोलिसांनी अटक केल्याचे लिहिले होते. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिने पोलिसांत फिर्याद दाखल केली.