‘गो फर्स्ट’ विमानसेवा बंद पडल्याने परदेशात अडकलेल्या प्रवाशांची सोय करा
By नितीश गोवंडे | Published: May 10, 2023 05:34 PM2023-05-10T17:34:31+5:302023-05-10T17:34:40+5:30
‘गो फर्स्ट’ कंपनीची विमान गेल्या काही दिवसांपासून बंद असल्याने विमाने पुन्हा उड्डाण घेतील की नाही, याबाबत साशंकता
पुणे : ‘गो फर्स्ट’ विमान कंपनीची विमाने जमिनीवर आल्याने या कंपनीच्या विमानांची तिकीटे बुक केलेले अनेक प्रवासी परदेशात व देशातील वेगवेगळ्या ठिकाणी अडकून पडले आहेत. या प्रवाशांना परत आणण्यासाठी इतर एअरलाइन्सच्या माध्यमातून सोय करावी. यासह प्रवाशांचे अडकलेले पैसे परत करण्यासाठी योजना तयार करावी, अशी मागणी हवाई वाहतूक तज्ज्ञ धैर्यशील वंडेकर यांनी हवाई वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे मेलद्वारे केली आहे.
‘गो फर्स्ट’ कंपनीची विमान गेल्या काही दिवसांपासून जमिनीवरच आहेत. की विमाने पुन्हा उड्डाण घेतील की नाही, याबाबत साशंकता आहे. त्यामुळे या विमान कंपनीची तिकीटे बुक केलेल्या प्रवाशांसह एअरलाइन्सचे कर्मचारीही परदेशात अडकून पडले आहेत. त्यांचे कुटुंबीय त्यांना परत आणण्यासाठी धडपडत आहेत. त्यामुळे या प्रवाशांची सोय करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
मेलद्वारे वंडेकरांनी केलेल्या सूचना..
- ‘गो फर्स्ट’ची उड्डाणे रद्द झालेल्या मार्गावर इतर विमान कंपन्यांनी नवीन बुकिंग स्विकारण्यापूर्वी ‘गो फर्स्ट’च्या अडकलेल्या प्रवाशांना प्राधान्य देण्याची विनंती करावी.
- या कंपनीने उड्डाणे रद्द केलेल्या आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत मार्गांवर ‘रेस्क्यू फेअर’ लागू करावा. त्या मार्गावर सध्या कार्यरत असलेल्या सर्व भारतीय विमान कंपन्यांच्या सहकार्याने प्रवाशांना सेवा द्यावी.
- संबंधित विमान कंपनीचा क्रू आणि कर्मचारी विविध देशांमध्ये अडकले आहेत, त्यांना परत येण्यासाठी मदत करावी.
- प्रवाशांना त्यांच्या तिकिटाचा संपूर्ण परतावा त्यांच्याच बँक खात्यात मिळावा, यासाठी यंत्रणा कार्यान्वित करावी.