पुणे विभागाच्या सर्व रेल्वेगाड्यांना‘बायोटॉयलेट’ची सुविधा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2019 01:24 PM2019-01-04T13:24:26+5:302019-01-04T13:31:49+5:30
‘स्वच्छ रेल्वे-स्वच्छ भारत’ अभियानांतर्गत मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने ८०० रेल्वे डब्यांमध्ये बायोटॉयलेट बसविले आहे.
पुणे : ‘स्वच्छ रेल्वे-स्वच्छ भारत’ अभियानांतर्गत मध्य रेल्वेच्यापुणे विभागाने ८०० रेल्वे डब्यांमध्ये बायोटॉयलेट बसविले आहे. येत्या जुन महिन्यापर्यंत उर्वरित २०० डब्यांमध्ये ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती विभागीय व्यवस्थापक मिलिंद देऊस्कर यांनी दिली. त्यामुळे रेल्वे मार्गावर होणाऱ्या घाणीपासून लवकरच सुटका होणार आहे.
पुणे विभागातून प्रामुख्याने झेलम, आझाद हिंद, पटना, अहमदाबाद दुरांतो, सिंकदराबात शताब्दी, वेरावल, गोरखपूर, मंडूआडीह, एनॉकुलम, दरभंगा, लखनऊ, अमरावती तसेच कोल्हापूरहून सुटणारी महाराष्ट्र, सह्याद्री, कोयना, धनबाद तसेच नागपुर एक्सप्रेस आणि मिरजमधून सुटणाऱ्या काही एक्सप्रेस गाड्यांसह पॅसेंजर गाड्या सुटतात. या गाड्यांना सुमारे १ हजार डबे आहेत. रेल्वे प्रशासनाने या सर्व डब्ब्यांमध्ये बायोटॉललेयटची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. रेल्वेमार्गावर पडणारी घाण रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आतापर्यंत ८०० डब्ब्यांमध्ये बायोटॉललेट बसविण्यात आले आहे. तर उर्वरीत २०० डब्ब्यांमध्ये जुन महिन्यापर्यंत ही सुविधा पुरविली जाईल.
मिरज, कोल्हापूर, सांगली, सातारा स्थानकांवर काही गाड्या बराच वेळ थांबतात. पण याठिकाणी रेल्वेमार्ग स्वच्छ करता येत नसल्याने डब्ब्यांमधील स्वच्छतागृहातून पडणारी घाण रेल्वेमार्गावर पडते. त्यामुळे स्थानकांमध्येही दुर्गंधी पसरते. बायोटॉयलेट लावल्यामुळे या स्थानकांसह रेल्वेमार्गावर कुठेही अस्वच्छता राहणार नाही. तसेच पुणे स्थानक परिसरात बायोटॉयलेटच्या वापराबाबत माहिती देणारी सुविधाही करण्यात आली आहे, असे देऊस्कर यांनी सांगितले.
-------------
बायोटॉयलेट प्रणालीमध्ये खाली एक टाकी बसविण्यात आली. त्यामध्ये विशेष प्रकारचे जिवाणू असतात. हे जिवाणू जैविक प्रकियेद्वारे मानवी विष्टेचे रुपांतर द्रवरुपात करतात. तर अस्वच्छ पाण्याला क्लोरीनच्या माध्यमातून स्वच्छ केले जाते. त्यामुळे रेल्वे मार्गावर अस्वच्छता होत नाही.
- मिलिंद देऊस्कर, विभागीय रेल्वे व्यवस्थापक
-------