नागरी केंद्रांमधून सुविधाच गायब, एजंटांकडून लूट सुरूच : चौकशी कक्षच नाही, माहिती मिळण्यात अडचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 06:51 AM2017-11-15T06:51:40+5:302017-11-15T06:51:54+5:30
नागरिकांना जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, रहिवास दाखला, नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र आदी कागदपत्रे सुलभपणे मिळावीत, यासाठी शिवाजीनगर धान्य गोडाऊन येथे नागरी सुविधा केंद्र सुरू करण्यात आले.
पुणे : नागरिकांना जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, रहिवास दाखला, नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र आदी कागदपत्रे सुलभपणे मिळावीत, यासाठी शिवाजीनगर धान्य गोडाऊन येथे नागरी सुविधा केंद्र सुरू करण्यात आले. मात्र तिथल्या केंद्रात माहिती मिळण्यासाठी चौकशी कक्ष नाही, त्यामुळे नागरिक भांबावून जात आहेत. त्यामुळे अजूनही अनेक लोकांना एजंटांवरच अवलंबून राहावे लागत आहे. एजंटांकडून ३४ रुपयांच्या दाखल्यासाठी २ ते ५ हजार रुपये घेऊन लूट केली जात असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीमध्ये आढळून आले.
शिवाजीनगर येथील धान्य गोडाऊनच्या नागरी सुविधा केंद्रांमध्ये शैक्षणिक व शासकीय कामकाजासाठी लागणारी कागदपत्रे नागरिकांची नेहमीच गर्दी असते. लोकमत टीमने दोन दिवस या नागरी सुविधा केंद्रांची पाहणी करून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. छोट्या छोट्या गोष्टींसाठी नागरिकांना अनेक चकरा माराव्या लागत असल्याचे, तसेच याला कंटाळून एजंटांकडे जावे लागत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
नवीन रेशनकार्ड काढणे, रेशनकार्डमध्ये नाव घालणे आदी कामांसाठी नागरिकांची बरीच गर्दी दिसली. शहराच्या विविध भागांतून तसेच ग्रामीण भागातून आलेल्या अशिक्षित लोकांना एजंटांची मदत घेण्याशिवाय पर्याय नसल्याचे दिसून आले. सर्व प्रकारच्या दाखल्यांसाठी कोणती कागदपत्रे जोडावी लागतील, याची माहिती देणारे फलक मात्र कार्यालयात सर्वत्र लावण्यात आले आहेत. हे फलक वाचून त्यानुसार काही जण अर्ज भरत होते. मात्र दाखल्यांसाठी जोडाव्या लागणाºया कागदपत्रांची खूपच मोठी जंत्री जोडण्यास सांगण्यात आली आहे. पुण्यात भाड्याने राहणाºयांची संख्या खूप मोठी आहे, त्यामुळे पत्त्याच्या पुराव्याची मोठी अडचण लोकांना जाणवते. रहिवास प्रमाणपत्रासाठी तुम्ही राहत असलेल्या ठिकाणचे १० वर्षांपासूनचे प्रत्येक वर्षीचे १ याप्रमाणे १० लाइट बिल जोडून द्या, असे सांगितले गेले असे कागदपत्र गोळा करणे नागरिकांना अवघड जात आहे. त्यामध्ये सुधारणा करण्याची मागणी नागरिकांनी केली.
पाणी, स्वच्छतागृहांची नाही व्यवस्था
नागरी सुविधा कार्यालयात नागरिकांना पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह आदींचा अभाव आढळला. परिसरातही कुठेही महिलांसाठी स्वच्छतागृह नसल्याने महिलावर्गाची कुचंबणा होत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. पुरुष मंडळी उघड्यावरच लघुशंका करीत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही. केवळ कर्मचाºयांसाठी माठ व पाण्याच्या बाटल्या ठेवल्या आहे. कचराकुंडीचा अभाव असल्याने परिसरात कचरा साचला आहे. झाडेझुडपे बरीच वाढली आहेत. परिसरातील अनेक रोहित्रांना झाकणे नसल्याने ती उघडी पडली आहे. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
व्यवस्थित माहिती देत नाही
माझ्या पाल्याला स्कॉलरशिपसाठी उत्पन्नाचा दाखला हवा आहे. यासाठी महिन्यापासून नागरी सुविधा केंद्रामध्ये हेलपाटे मारत आहोत. परंतु अद्याप दाखला मिळाला नाही. केंद्रामध्ये संपर्क अधिकाºयांना भेटण्यासाठीसुद्धा ते जागेवर उपलब्ध नसल्यामुळे त्यांची भेट होत नाही. लोकमतची बातमी वाचून काही तरी निर्णय झाला असेल म्हणून आज सुविधा केंद्रात आल्यावर पुन्हा तहसीलदारांना भेटा म्हणून सांगितले आहे. - मंगल परदेशी, वडगावशेरी
एजंटांकडून प्रचंड लूट
मला रहिवास प्रमाणपत्र काढायचे होते, त्यासाठी सुविधा केंद्रात आलो होतो. मला गेटवरच काही एजंटांनी अडवून काय काम आहे, असे विचारले. काम सांगितल्यानंतर त्यांनी काम करून देतो, ७००० रुपये लागतील, असे सांगितले. कार्यालयात गेल्यावर डोमिसाईल काढण्यासाठी फक्त ३३ रुपये खर्च येतो, असे समजले. एखाद्या अशिक्षित व्यक्तीला जर कुठला दाखला काढायचा असल्यास त्यांची प्रचंड लूट केली जाते. - विक्रम सुतार, हडपसर
अर्ज जमा करतानाच त्रुटी सांगत नाहीत
दोन महिन्यांपूर्वी कुणबी जात प्रमाणपत्र मिळण्यास अर्ज केला होता. त्यासाठी लागणाºया सर्व कागदपत्रांची पूर्तता केली. दिलेल्या तारखेला गेल्यानंतर कागदपत्रांमध्ये त्रुटी आहे असे सांगितले, परंतु काहीही त्रुटी आढळली नाही. पुन्हा नव्याने फॉर्म जमा करून पुढची तारीख दिली गेली. फॉर्ममध्ये त्रुटी आहेत की नाही, हे फॉर्म जमा करतानाच तपासले तर नागरिकांना त्रास होणार नाही. - सागर लोखंडे, कोथरूड