विद्यार्थिनींसाठी सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशिनची सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 11:39 PM2018-08-28T23:39:47+5:302018-08-28T23:40:16+5:30
खराबवाडी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित नवमहाराष्ट्र विद्यालयात विद्यार्थिनींसाठी सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशिन सुविधेचे उद्घाटन करण्यात आल्याची माहिती मुख्याध्यापक अविनाश कड यांनी दिली.
चाकण : खराबवाडी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित नवमहाराष्ट्र विद्यालयात विद्यार्थिनींसाठी सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशिन सुविधेचे उद्घाटन करण्यात आल्याची माहिती मुख्याध्यापक अविनाश कड यांनी दिली. खराबवाडी येथील माहिला बचत गटाच्या वतीने व निगडी येथील कार्बियॉन मल्टिसर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीच्या विशेष सहकार्याने या मशिनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. या माशिनद्वारे माफक दरामध्ये विद्यार्थिनींसाठी सॅनटरी पॅड उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
महिला बचत गटाच्या माध्यमातून प्रशालेत एक अभिनव व स्तुत्य उपक्रम सुरू केल्याबद्दल संस्थेच्या संचालक मंडळाने महिलांचे कौतुक करून आभार मानले. या मशिनच्या खरेदीसाठी खराबवाडीतील बचत गटाच्या महिला रेवती कड, अनिता कड, नंदा कड, मंगल देवकर, चारुशीला माने, योजना सोमवंशी व संगीता केसवड यांनी विशेष सहकार्य केले. मशिनच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. एस. एल. भोसले, डॉ. इंगवले, प्रशांत अष्टेकर, सहशिक्षक राजेश बोराटे, अशोक ठाणगे, सहशिक्षिका अश्विनी मेदनकर, मैथिली जाधव, चेतना कड, तनुजा खराबी उपस्थित होत्या.
प्रशालेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनींना मासिक पाळीच्या कालावधीत अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. समाजात मासिक पाळीसंदर्भात असलेले गैरसमज, योग्य शास्त्रीय माहितीचा अभाव व आरोग्य हितकारक साधनांची कमतरता इत्यादी कारणांनी मासिक पाळीमुळे मुलीच्या शिक्षणात व्यत्ययदेखील येतो. या सर्व बाबींचा विचार करून मासिक पाळीबाबतची शास्त्रीय माहिती देणे व या संदर्भातील आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशालेत हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला.