शासकीय कार्यालयातच मिळणार यापुढे ‘आधार’ नोंदणीची सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 09:37 PM2018-05-31T21:37:03+5:302018-05-31T21:37:03+5:30
शासनाच्या आदेशानुसार आता सर्व आधार केंद्र शासकीय कार्यालयांमध्ये हलविण्यात येणार आहेत.
पुणे : जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे ९० टक्क्यांपेक्षा अधिक नागरिकांची आधार नोंदणी झाली आहे. शासनाच्या आदेशानुसार सध्या सर्व राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका, टपाल कार्यालय , नागरी सुविधा केंद्र, महापालिकांची क्षेत्रीय कार्यालये या ठिकाणी आधार केंद्र सुरु करण्यात आली आहेत. जिल्ह्यात सध्या तब्बल साडे तीनशेहून अधिक आधार केंद्र सुरु आहेत. परंतु या सर्व ठिकाणी सुरु असलेल्या आधार केंद्रांचे नियोजन, स्मनवय ठेवणे कठीण जाते. यामुळे शासनाच्या आदेशानुसार आता सर्व आधार केंद्र शासकीय कार्यालयांमध्ये हलविण्यात येणार आहेत.
आधारची कामे करणाऱ्या खासगी कंपन्यांनी सामान्य नागरिकांकडून शुल्क घेण्यास सुरुवात केल्याच्या असंख्य तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे आल्या. त्यानंतर राज्य शासनाने खासगी कंपन्यांकडून कामे काढून सरकारी महाआॅनलाइन कंपनीकडे कामे सोपविली होती. तसेच आधारची सर्व कामे शासकीय कार्यालयांमधूनच करण्याबाबत राज्य शासनाकडून अधिसूचना काढण्यात आली होती. परंतु, महाआॅनलाइनला आधारची ही मोठी यंत्रणा झेपली नाही. याबरोबरच राज्य शासनाने विविध अधिसूचना काढून पुन्हा रद्द करणे, महाआॅनलाइन आणि खासगी कंपन्यांमधील टक्केवारीचा वाद, तांत्रिक बाबी आणि किचकट प्रक्रिया अशा विविध कारणांमुळे जून २०१७ पासून शहर आणि जिल्ह्यातील आधार यंत्रणा ठप्प झाली होती. या सर्व पार्श्व भूमीवर जिल्हा प्रशासनाकडून आधारची केंद्रे सर्वत्र सुरू ठेवण्याबाबत राज्य शासनाकडे विनंती करण्यात आली होती. मात्र, शहरासह जिल्ह्यात पुरेशी आधार केंद्र सुरळीत सुरू असल्याने नियमानुसार सर्व आधार केंद्र शासकीय कार्यालयांमध्ये हलविण्यात येणार आहेत.
शहरातील बँकांमध्ये ६१, टपाल कार्यालयांमध्ये ४७, महाआॅनलाइन केंद्रांमध्ये ४५, पुणे महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये २०, पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील बँकांमध्ये १४, टपाल कार्यालयांमध्ये १७, महाआॅनलाइन केंद्रांमध्ये १२, महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये ८, नागरी सुविधा केंद्रांमध्ये १८ आणि ग्रामीण भागात १२० अशी जिल्ह््यात एकूण ३६२ आधार केंद्रे सुरू आहेत. तसेच देशातील प्रत्येक बँकांनी त्यांच्या दहा शाखांमागे एक आधार नोंदणी केंद्र सुरू करावे, असा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. त्याबाबतचा अध्यादेशही केंद्राकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्याकरिता देशातील प्रत्येक जिल्ह्यासाठी केंद्र शासनाकडून १२९ आधार यंत्रे पुरविण्यात आली आहेत. त्यानुसार शहर आणि जिल्ह्यातील विविध बँका आणि टपाल कार्यालयांमध्ये आधार केंद्र सुरू करण्यात आली आहेत.
---------------
शासकीय कार्यालयांमधून आधार सेवेचे कामकाज
येत्या काही दिवसांत शहर आणि आधार केंद्रांची संख्या आणखी वाढणार असून पाचशे आधार केंद्रे झाल्यानंतर शासनाच्या नियमानुसार सर्व आधार केंद्रे शासकीय कार्यालयांमध्ये हलविण्यात येणार असून आधार सेवेचे कामकाज तेथूनच चालणार आहे, अशी माहिती आधार समन्वयक अधिकारी मनोज जाधव यांनी दिली.