Ashadhi Wari: वारकऱ्यांसाठी १ हजार ६९० शौचालयांची सुविधा; पालखीसाठी घनकचरा व्यवस्थापन विभाग सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 11:20 AM2024-06-27T11:20:10+5:302024-06-27T11:20:34+5:30
पालिकेच्या घनकचरा विभागाने शहरात दिवसातून तीनवेळा सार्वजनिक स्वच्छतेचे कामकाज करण्याचे नियोजन केले आहे
पूणे : श्री संत ज्ञानेश्वर महाराज (Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi) आणि श्री संत तुकाराम महाराज (Sant Tukaram Maharaj Palkhi) यांच्या पालख्यांचे आगमन ३० जून रोजी पुणे शहरात होत आहे. त्यासाठी पालिकेच्या घनकचरा विभागाने शहरात दिवसातून तीनवेळा सार्वजनिक स्वच्छतेचे कामकाज करण्याचे नियोजन केले आहे. १५ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत सर्व सार्वजनिक रस्त्यांचे झाडकाम, क्रॉनिक स्पॉटची स्वच्छता व जमा होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे नियोजन सर्व क्षेत्रीय कार्यालयांकडून करण्यात आले आहे. शहरात वारकऱ्यांसाठी १ हजार ६९० पोर्टेबल व फिरती शौचालये पुरविण्यात येणार आहेत. पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) घनकचरा विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांनी ही माहिती दिली.
पुणे पालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत सर्व सार्वजनिक रस्त्यांचे झाडकाम, क्रॉनिक स्पॉटची स्वच्छता व जमा होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे नियोजन सर्व क्षेत्रीय कार्यालयांकडून करण्यात आले आहे. शहरात दिवसातून तीनवेळा सार्वजनिक स्वच्छतेचे कामकाज करण्यात येणार आहे. भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत स्वच्छताविषयक कामकाज करण्यासाठी अंदाजे एकूण ३५० पुरुष सफाई सेवक व २५० महिला सफाई सेविका असे एकूण ६०० सफाई सेवक आहेत. भवानी पेठ कार्यालयात अन्य क्षेत्रीय कार्यालयांकडून ६० अतिरिक्त सेवकांची नेमणूक करण्यात आली आहे. भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात ७ जेटिंग मशीनद्वारे साफसफाईचे कामकाज करण्यात आले. तसेच इतर क्षेत्रीय कार्यालयांतर्गतही सफाई सेवकांमार्फत व आवश्यकतेनुसार जेटिंग मशीनद्वारे सार्वजनिक शौचालये, मुतारी व सर्व सिंगल पोर्टेबल टॉयलेटची स्वच्छता करण्यात येणार आहे. भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात महिला वारकऱ्यांसाठी आवश्यकतेनुसार मनपा शाळेत व खासगी शाळेत मुक्कामाच्या ठिकाणी तसेच अन्य क्षेत्रीय कार्यालयांतर्गतदेखील महिला वारकऱ्यांसाठी शौचालय व न्हाणीघराची व्यवस्था करण्यात येणार आहे.
५० हजार सॅनेटरी नॅपकिन्सचे मोफत वाटप
सार्वजनिक रस्त्यावर वारकरी मुक्कामी असलेल्या ठिकाणी स्वच्छता राहण्याच्या दृष्टीने सर्व क्षेत्रीय कार्यालयांकडून आवश्यकतेनुसार सार्वजनिक स्वच्छताविषयक काम केले जाणार आहे. घनकचरा व्यवस्थापन मुख्य विभागाकडून २ हजार ६२५ लिटर जर्मीक्लीन, ३७ हजार ५०० किलो कार्बोलिक पावडर, १९ हजार २५० किलो हर्बल वेस्टस्ट्रीट पावडर पुरविण्यात आली आहे. महिला वारकऱ्यांसाठी ५० हजार सॅनेटरी नॅपकिन्सचे मोफत वाटप करण्यात येणार आहे.