Pune: दिव्यांगत्व प्रमाणपत्र काढताना अनेक ‘दिव्यां’चा सामना
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2021 12:51 PM2021-12-27T12:51:14+5:302021-12-27T12:53:22+5:30
केसपेपर काढण्यासाठी स्वतंत्र खिडकी नसणे, प्रवर्गनिहाय दिवस निश्चित नसल्याने सर्व प्रकारच्या दिव्यांगांची एकाच वेळी गर्दी होणे, अशा समस्या उद्भवतात...
प्रज्ञा केळकर-सिंग
पुणे : ‘माझे मागील वेळचे प्रमाणपत्र ५८ टक्के दिव्यंगत्वाचे होते, पुढील वेळी ससून रुग्णालयात तपासणी झाल्यावर ४८ टक्के दिव्यंगत्वाचे प्रमाणपत्र मिळाले. दरवेळी टक्का कमी केला जात असेल तर सवलत मिळणार कशी’...‘कमला नेहरू रुग्णालयात महिनाभर दोन-तीन फेऱ्या मारल्यावर प्रमाणपत्र मिळाले, माहिती नीट मिळत नाही, बोलण्याची पद्धत नीट नाही’....या उद्विग्न प्रातिनिधिक प्रतिक्रिया आहेत प्रमाणपत्रांसाठी हेलपाटे माराव्या लागणाऱ्या दिव्यांगांच्या! औंध जिल्हा रुग्णालय, ससून रुग्णालयात प्रमाणपत्रे मिळण्याच्या दिवशी अक्षरश: जत्रा भरलेली पाहायला मिळते.
केसपेपर काढण्यासाठी स्वतंत्र खिडकी नसणे, प्रवर्गनिहाय दिवस निश्चित नसल्याने सर्व प्रकारच्या दिव्यांगांची एकाच वेळी गर्दी होणे, अशा समस्या उद्भवतात. सध्या शहरात ससून सर्वोपचार रुग्णालय, औंध जिल्हा रुग्णालय, कमला नेहरू रुग्णालय या रुग्णालयांमध्ये दिव्यांग प्रमाणपत्रांची सोय केलेली आहे. मात्र, गर्दी होत असल्याने प्रमाणपत्रांसाठी हेलपाटे मारण्याशिवाय गत्यंतर राहत नाही.
१) औंध जिल्हा रुग्णालय
- केसपेपर काढताना दिव्यांगांसाठी स्वतंत्र खिडकी नाही
- इंटरनेटमुळे अनेकदा यंत्रणा बंद असते.
- गेटजवळ दिव्यांगांसाठी पार्किंग नाही.
- व्हिलचेअर उपलब्ध नाही.
- जिल्ह्यातील भोर, बारामती, इंदापूर, मंचर आणि दौंड या ५ उपजिल्हा रुग्णालयांत दोनच प्रवर्गांची प्रमाणपत्रे दिली जातात.
- पूर्वी केवळ बुधवारी प्रमाणपत्र मिळायचे. आता बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार असे तीन दिवस ठरविले आहेत.
२) ससून रुग्णालय
- केसपेपरसाठी स्वतंत्र खिडकी नाही, व्हिलचेअर नाही, पार्किंगची सुविधा नाही.
- दिव्यांगांसाठी बांधलेल्या सुलभ स्वच्छतागृहाच्या रॅम्पवर अनेक गाड्या लावलेल्या असतात.
- बुधवार आणि शुक्रवार असे दोनच दिवस प्रमाणपत्र वितरित होते. प्रवर्गनिहाय नियोजन नाही.
- रुग्णालयातील एका वॉर्डातून दुसऱ्या वॉर्डात जाण्यासाठी असणाऱ्या गाड्या धूळ खात पडून आहेत.
३) कमला नेहरू रुग्णालय
- केसपेपरसाठी स्वतंत्र खिडकी नाही.
- तीन आठवड्यांपासून दृष्टिदोषतज्ज्ञ नसल्यामुळे अंध दिव्यांगांना प्रमाणपत्रे मिळत नाहीत
- एकवीस प्रवर्गांपैकी फक्त तीन-चारच प्रवर्गातील दिव्यांगांना प्रमाणपत्रे दिली जातात.
- भौतिकोपचार विभाग चौथ्या मजल्यावर असल्यामुळे दिव्यांगांना खाली-वर करण्यासाठी खूप त्रास होतो.
- आठवड्यातून एक दिवस केवळ बुधवारी प्रमाणपत्रे दिली जातात.