साखरेला उठाव नसल्याने कारखाने अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:10 AM2021-03-22T04:10:43+5:302021-03-22T04:10:43+5:30
अवसरी: नुकत्याच झालेल्या गाळप हंगामात साखर उत्पादन अधिक झाले आहे. मात्र, केंद्र सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे साखरेला उठाव नाही. त्यामुळे ...
अवसरी: नुकत्याच झालेल्या गाळप हंगामात साखर उत्पादन अधिक झाले आहे. मात्र, केंद्र सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे साखरेला उठाव नाही. त्यामुळे साखर गोडावूनमध्ये पडून असल्याने साखर कारखानदारी अडचणीत आहे. केंद्र सरकारने साखर कारखान्यांबाबत धोरणात्मक निर्णय घेणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन राज्याचे कामगार व राज्य उत्पादन शुल्क, मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले.
दत्तात्रयनगर पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याची सन २०१९-२० आर्थिक वर्षाची २४ वी अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी चेअरमन बाळासाहेब बेंडे, या वेळी पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष विष्णू हिंगे, जिल्हा परिषद समाज कल्याणचे माजी सभापती सुभाष मोरमारे, पंचायत समितीचे माजी सभापती वसंतराव भालेराव, सखाराम घोडेकर, आनंदराव शिंदे, माजी उपसभापती नंदकुमार सोनावले, यशवंत वाहतूक संस्थेचे अध्यक्ष गणपतराव इंदोरे, शरद सहकारी बॅंकेचे माजी अध्यक्ष सूर्यकांत थोरात, कारखान्याचे माजी संचालक पांडुरंग सैद आदी उपस्थित होते.
वळसे पाटील म्हणाले की, चालू गळीत हंगामात कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर यशस्वीपणे कारखान्याने विस्तारीकरण केल्यामुळे दररोज साडेसहा हजार मे.टन उसाचे गाळप होत असून ९ लाख ५० हजार मे.टन गाळपाचे उद्दिष्ट आहे. कोव्हिड आजाराचे उपाययोजनासाठी जेथे सरकार कमी पडेल तेथे कारखाना व तालुक्यातील सहकारी संस्थांमार्फत मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. लवकरच डिस्टीलरी प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार असून त्यापासून अधिकचे उत्पन्न मिळणार आहे. त्यामधून ऊस उत्पादकांना नेहमीच चांगला दर देण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच भाग विकास निधीमधूनही आवश्यक ती मदत करण्यात येते. सभासद, ऊस उत्पादक, हितचिंतक व कामगार या सर्वांच्या सहकार्यामुळे कारखाना प्रगती करीत आहे.
बाळासाहेब बेंडे म्हणाले की, कोरोना काळात कारखान्याने सामाजिक बांधिलकी जपत ऊसतोड मजुरांना जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करून त्यांना त्यांच्या घरी सुखरूप पोहचवण्याचे काम केले आहे. याशिवाय शेतकऱ्यांसाठी ठिबक सिंचन, रोपवाटिका, बायोकंपोस्ट असे विविध प्रकल्प राबवून शेतकऱ्यांचे हीत साधले आहे. याशिवाय ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नेहमीच चांगला ऊस दर देण्याचा प्रयत्न केलेला आहे.
२१ अवसरी कारखाना सभा
भीमाशंकर कारखान्याच्या सभेप्रसंगी उपस्थित असलेले दिलीपराव वळसे पाटील, बाळासाहेब बेंडे व इतर.