फडणवीसांचे अजितदादांना चहाचे निमंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:10 AM2021-01-02T04:10:15+5:302021-01-02T04:10:15+5:30
पूर्व पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या भीमा आसखेड प्रकल्पाचे ऑनलाईन उद्घाटना अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी (दि. १) ...
पूर्व पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या भीमा आसखेड प्रकल्पाचे ऑनलाईन उद्घाटना अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी (दि. १) करण्यात आले. त्यानंतर फडणवीस बोलत होते. या कार्यक्रमाची राजकीय वर्तुळात तसेच माध्यमांमध्ये खूप चर्चा झाली होती. या अनुषंगाने पवार आणि फडणवीस दोघांनीही वक्तव्ये केली.
फडणवीस म्हणाले की, खरे तर महाराष्ट्राची परंपरा आहे. लोकविकासाच्या कार्यक्रमात सर्वांनी मिळून पुढे जायचे असते. याच संदर्भाने अजित पवार म्हणाले, “मीही दोन-तीन दिवस बघत होतो. सारखे तेच तेच. नवीन बातम्या दाखवायला नाही मिळाल्या की या बातम्यांना जोर येतो.” महापौरांनी मला या कार्यक्रमाबद्दल विचारले तेव्हा मी म्हणालो, की आधी देवेंद्रजींची वेळ घ्या. कारण मी पुण्यातच असतो. त्यांच्या वेळेनुसार मी अँडजेस्ट करुन घेईन, असेही पवार यांनी सांगितले.
चौकट
‘त्या’ दोघांना अडचण नाही तर..
प्रास्ताविकात पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, “लोकहिताच्या या प्रकल्पाला सर्व पक्षाच्या आजी-माजी लोकप्रतिनिधींनी मदत केली. पण उदघाटनाची वेळ आल्यावर ''''राष्ट्रवादी''''च्या सदस्यांनी ठराव दिला की अजित पवार यांच्या हस्ते उदघाटन झाले पाहिजे. आमच्या भाजपच्या सदस्यांनी ठराव दिला की, देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन झाले पाहिजे. महापौर म्हणून माझी कसरत होती. मी अजित पवार यांच्याकडे गेलो तर ते म्हणाले, ‘देवेंद्रजींची वेळ घ्या.’ देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेलो तर ते म्हणाले, “अजितदादांची वेळ घ्या." एकत्र येण्यात त्यांना अडचण नसते. मग आपल्याला का असावी, हे लक्षात घेऊन दोघांच्या उपस्थितीत उद्घाटनाचा निर्णय झाला.”