फडणवीसांचा 'एकला चलो रे' चा नारा अन् चंद्रकांत दादा म्हणतात; ...तर मनसेसोबत युती शक्य
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2021 09:04 PM2021-02-11T21:04:38+5:302021-02-11T21:07:51+5:30
भाजपमधील दोन दिग्गज नेत्यांनी घेतलेल्या या वेगवेगळ्या भूमिकांबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
प्राची कुलकर्णी -
पुणे : गेल्या काही दिवसांपासून भाजप-मनसे युतीचे वारे राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत होते. मात्र, माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी ( दि. ११ ) पुणे दौऱ्यावर आले असताना पुणे महापालिका निवडणुकांसाठी स्वबळाचा नारा दिला आहे. स्वबळाची घोषणा करून काही तास उलटत नाही तोच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मात्र मनसेने भूमिका बदलली तर युती शक्य असल्याचे मोठे विधान केले आहे. पण भाजपमधील दोन दिग्गज नेत्यांनी घेतलेल्या या वेगवेगळ्या भूमिकांबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजप मनसे युतीची चर्चा सुरु असताना देवेंद्र फडणवीसांनी महापालिका निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा दिला आहे. आम्हाला कोणाची गरज नाही, आम्ही आमच्याच ताकदीवर निवडणुक लढवू अन् जिंकू शकतो असे फडणवीस यांनी आत्मविश्वास दाखविला होता. फडणवीस हे आज पुणे महापालिकेच्या वेगवेगळ्या विकास कामांचा आढावा घेण्यासाठी पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
विशेष म्हणजे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील या बैठकीला उपस्थित नव्हते. मात्र वेगळी भूमिका घेतली आहे. आगामी निवडणुकांत राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेससोबत जाण्याचा प्रश्न उद्भवत नाही. राहिला प्रश्न मनसेचा. त्यांनी त्यांची भूमिका बदलावी हे आम्ही यापूर्वीच स्पष्ट केले आहे. त्यांनी जर भूमिका बदलली तर त्यांना सोबत घेऊ, अन्यथा आम्ही एकटेच लढू असं पाटील म्हणाले आहेत.
दरम्यान, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीनही पक्षांनी भाजप सत्तेत येऊ नये यासाठी जोरदार कंबर कसली आहे. हे पक्ष अधिकृतरित्या सोबत येणार नाहीत. मात्र सामंजस्याने एकत्रित निवडणुक लढवतील असेही पाटील यांनी यावेळी सांगितले आहे.
अशोक चव्हाणांनी तरी वाचलाय का सत्तावीसशे पानी अहवाल ? चंद्रकांत पाटील यांचा सवाल
दरम्यान, पाटील यांनी मराठा आरक्षणाबाबत आपण उदयनराजे भोसले यांच्या भूमिकेशी सहमत असल्याचे म्हणले आहे. हे बोलतानाच त्यांनी अशोक चव्हाण यांनी तरी मराठा आरक्षणाचा सत्तावीसशे पानी अहवाल पूर्ण वाचला आहे का, असा प्रश्न विचारला आहे.