फडणवीसांची यूट्यूबवर बदनामी; वाकडमध्ये एक जण ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:12 AM2021-03-05T04:12:53+5:302021-03-05T04:12:53+5:30
पिंपरी : विधानसभेचे विरोधी पक्षनेता तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत आक्षेपार्ह व बदनामीकारक मजकूर असलेला व्हिडीओ यूट्यूबवर प्रसारित ...
पिंपरी : विधानसभेचे विरोधी पक्षनेता तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत आक्षेपार्ह व बदनामीकारक मजकूर असलेला व्हिडीओ यूट्यूबवर प्रसारित केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला. जगतापनगर, थेरगाव येथे मंगळवारी (दि.२) हा प्रकार घडला. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि.४) गुन्हा दाखल झाला.
युवराज दाखले (रा. तापकीरनगर, काळेवाडी), असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी ३७ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फडणवीस यांच्याबाबत आक्षेपार्ह, अश्लील व बदनामीकारक मजकूर असलेले वक्तव्य करून आरोपीने त्याचा व्हिडीओ यूट्यूबवर प्रसारित केला. त्याबाबत आरोपीकडे कोणत्याही प्रकारचा पुरावा नसतानाही सोशल मीडियावर व्हिडीओ प्रसारित केला. त्यामुळे फिर्यादी आणि पक्षाच्या इतर कार्यकर्ते यांच्यात असंतोष व रोष निर्माण होऊन भावना दुखावल्या गेल्या, असे फिर्यादीत नमूद केले आहे.
भारतीय दंडविधान कलम २९४, ५०० नुसार गुन्हा दाखल केला आहे. वाकड पोलिसांनी आरोपी दाखले याला चाैकशीसाठी ताब्यात घेतले आहे. चिंंचवड येथील युवराज दाखले यांनी फडणवीसांची बदनामी केल्याप्रकरणी राज्य शासनाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितले. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी दाखले हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नसल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले. शिवसेनेतून हाकालपट्टी झाल्यानंतर दाखले यांनी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश केला होता. मात्र, दाखले यांना प्रवेश दिला नसल्याचे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले. संजोग वाघेरे म्हणाले, फडणवीस यांची बदनामी करणारा कार्यकर्ता राष्ट्रवादी काँग्रेसचा नाही. दाखले यांना राष्ट्रवादीचे सदस्यत्व दिले गेले नाही. आमचा कार्यकर्ता नाही. त्यामुळे कारवाई करण्याचा प्रश्नच येत नाही. याबाबत प्रदेश समितीकडे अहवाल पाठवू.