फडणीस ग्रुपने केली ३४२ गुंतवणूकदारांची ४८ कोटींची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:11 AM2021-05-06T04:11:49+5:302021-05-06T04:11:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : गुंतवणूकदारांना जादा व्याजाचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी फडणीस ग्रुप ऑफ कंपनीने ३४२ गुंतवणूकदारांची ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : गुंतवणूकदारांना जादा व्याजाचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी फडणीस ग्रुप ऑफ कंपनीने ३४२ गुंतवणूकदारांची तब्बल ४८ कोटी ८५ लाख ६० हजार १३९ रुपयांना गंडा घातला असल्याचे पुणे पोलिसांनी केलेल्या आतापर्यंतच्या तपासात उघड झाले आहे. याशिवाय फडणीस यांच्यावर नाशिक येथेही गुन्हा दाखल झाला असून, नाशिक पोलिसांनी त्यांची मालमत्ता जप्त केली आहे. विनय फडणीस यांची कन्या सायली फडणीस हिला फरार घोषित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, न्यायालयाने तिला २८ मे रोजी न्यायालयात हजर राहण्याचा आदेश दिला आहे.
याप्रकरणी २०१७ मध्ये अलंकार पोलीस ठाण्यात महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंधाचे अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात पोलिसांनी विनय प्रभाकर फडणीस (वय ५१), अनुराधा विनय फडणीस (वय ५०, दोघे रा. रामबाग कॉलनी, कोथरूड), शरयू विनायक ठकार (वय ५०) आणि भाग्यश्री सचिन गुरव (वय ५०) यांना अटक केली होती. विनय फडणीस हा सध्या न्यायालयीन कोठडीत असून इतरांना जामीन मिळाला आहे.
फडणीस प्रॉपट्रीज लि. फडणीस प्रॉपर्टीज इं. लि़., साहिल रिसोर्ट अँड स्पा़. लि़, फडणीस इन्फ्रास्ट्रक्चर, साहिल हॉस्पिटलिटी अशा वेगवेगळ्या नावाने कंपन्या स्थापन करून ब्रोकर उदय पाटणकर याच्यामार्फत व कर्वेनगर येथील कार्यालयात आणि इतर ब्रोकरांच्या मदतीने नागरिकांना बँक दरापेक्षा जास्त व्याज देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन केला. कंपन्यांची नावे बदलून स्थापन केलेल्या वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. गुंतवणूकदारांचे मूळ मुद्दल व व्याज परत न करता ३४२ गुंतवणूकदारांची ४८ कोटी ८५ लाख ६० हजार १३९ रुपयांची फसवणूक केल्याचे आतापर्यंतच्या तपासात उघडकीस आले आहे.
या गुन्ह्याच्या तपासात मुख्य आरोपी विनय फडणीस याची कन्या सायली फडणीस-गडकरी (वय २७) ही फडणीस ग्रुप ऑफ कंपनीतील वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये संचालक म्हणून कार्यरत आहे. त्यांचे इतर आरोपीशी देखील नातेसंबंध आहेत. सायली फडणीस यांना गुंतवणूकदारांनी केलेल्या रकमेची माहिती असून त्या संबंधीची कागदपत्रे त्यांच्याकडून हस्तगत करावयाची आहेत. गुंतवणूकदारांच्या रकमेतून खरेदी केलेल्या मालमत्तेची माहिती त्यांच्याकडे आहे. तसेच या रकमा कोठे वळविल्या, याची कागदपत्रे त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे पोलिसांनी सायली फडणीस यांचा त्यांच्या घरी शोध घेतला. मात्र, त्या मिळून आल्या नाहीत. त्यांचा अटकपूर्व जामीनही वरिष्ठ न्यायालयाने फेटाळला आहे. त्या न मिळाल्याने आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांनी त्यांना फरार घोषित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तसा अतिरिक्त जिल्हास्तर न्यायालयात अर्ज केला आहे. न्यायालयाने सायली फडणीस यांना जाहीर नोटीस काढली असून, २८ मे २०२१ पर्यंत न्यायालयात हजर राहण्याचा आदेश दिला आहे.