वृक्षारोपण उद्दिष्ट गाठण्यात अपयश
By admin | Published: April 22, 2016 12:57 AM2016-04-22T00:57:21+5:302016-04-22T00:57:21+5:30
दर वर्षी महापालिका उद्यान विभाग पावसाळ्याच्या तोंडावर वृक्षारोपण करण्याचे उद्दिष्ट ठेवते. मात्र, अनेक अडथळ्यांची शर्यत होऊनही वृक्षारोपणाचे उद्दिष्ट दर वर्षी फोल ठरते.
पिंपरी : दर वर्षी महापालिका उद्यान विभाग पावसाळ्याच्या तोंडावर वृक्षारोपण करण्याचे उद्दिष्ट ठेवते. मात्र, अनेक अडथळ्यांची शर्यत होऊनही वृक्षारोपणाचे उद्दिष्ट दर वर्षी फोल ठरते. जागतिक वसुंधरा दिनानिमित्त वृक्षारोपणाचा घेतलेला आढावा-
या वर्षी उद्यान विभागाने अवघे ६० टक्के उद्दिष्ट पूर्ण केले. वृक्षारोपणासाठी दर वर्षी लाखाच्या घरात बजेट मंजूर होते. मात्र, अंमलबजावणी कागदोपत्रीच राहते. वृक्ष प्राधिकरण समितीच्या उद्दिष्टालाही हरताळ फासला जातो. वृक्ष समिती नावालाच आहे की काय, असा प्रश्न वृक्षप्रेमींनी उपस्थित केला आहे. उद्यान विभागाच्या तक्रारीमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. त्यामध्ये वृक्षारोपणाच्या टेंडर प्रक्रियेचा गोंधळ, उद्यान स्थापत्यविषयक अपूर्ण कामे, वृक्षांना अपुरा मातीपुरवठा, अपुरे मनुष्यबळ, वृक्षारोपण व लागवड करण्यात टाळाटाळ अशा कित्येक अडचणी उद्यान विभागासमोर उभ्या आहेत. दर वर्षी पावसाळ्यात वृक्षारोपण करताना वृक्ष खरेदी उद्यान विभागाला करावी लागते. पालिकेकडे रोपवाटिका असूनही नियोजनाच्या अभावामुळे रोपे कमी पडतात. गतवर्षी पाच हजार झाडे उद्यान विभागाने विकत घेतली. तर या वर्षी दहा हजार झाडे विकत घेण्याचा मानस उद्यान विभागाने ठेवला आहे. त्यामुळे झाडे विकत घेऊनही त्याचे पुरेसे संवर्धन होत नसल्याने शहरात वृक्षवल्लीचे प्रमाण कमी झाले आहे. उच्च प्रतीची झाडे लावून त्याचे संवर्धन करण्याची जबाबदारी उद्यान विभागाची आहे. मात्र, ठरावीकच परवडणारी झाडे दर वर्षी लावली जातात. यामध्ये वड, पिंपळ, कडूनिंब, अर्जुन, बेल, रामफळ, फणस, आपटा, कांचन, बहावा, शिसम, पिंपळ, मोहगनी, पिंगारा, अशोक आदी झाडे दर वर्षी लावली जातात. उद्यान विभागाला ज्या भागात वृक्ष लावण्यास अडथळे निर्माण झाले, त्या भागातील वृक्षलागवड अद्यापपर्यंत पूर्ण झाली नाही. स्थापत्यविषयक कामे रेंगाळल्याने वृक्ष लावण्यास अडचणी निर्माण होत आहे,असे कारण उद्यान विभागाने सांगितले आहे. औंध रावेत बीआरटीएस रस्ता, दिघी गायरान, मोशी, बोऱ्हाडेवाडी, शहरातील अंतर्गत रस्ते, चिखली, सीएमईतील काही भाग अशा भागातील वृक्षारोपण अद्यापही रखडलेले आहे. त्यानंतर त्या ठिकाणी वृक्षारोपणच केले गेले नाही. वृक्षारोपणाच्या उद्दिष्टांमध्येही उद्यान विभागाने घट केली आहे. २०१३ या वर्षी एक लाख वृक्षारोपणाचे उद्दिष्ट होते. आता दर वर्षी ५० हजार वृक्ष लावण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. उद्दिष्ट कमी करूनही वृक्षारोपण पूर्ण झाले नाही. २०१४-१५ या कालावधीत वृक्षारोपण हे निम्म्यापेक्षा जास्त झाले. मात्र, २०१५-१६ या वर्षी ५० हजारांमधील ३४ हजार वृक्षारोपण पूर्ण झाले. उर्वरित १६ हजार वृक्षारोपण झालेच नाही. अवघे ६० टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले. (प्रतिनिधी)
> पालिकेला पडला विसर
उद्यान विभाग व पर्यावर विभागाला जागतिक वसुंधरा दिनाचा विसर पडला आहे. यापैकी दोन्ही विभागालाही हा दिवस साजरा करण्याचे परिपत्रकच आलेले नाही, असे उत्तर देण्यात आले आहे. त्यामुळे वसुंधरा दिनाचा कोणताही कार्यक्रम पालिकेमार्फत केला गेला नाही, हे स्पष्ट दिसून येते.