लोणीकंद केंद्रात बिघाड; वीजपुरवठा खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2018 01:09 AM2018-08-07T01:09:32+5:302018-08-07T01:09:46+5:30
महापारेषण कंपनीच्या लोणीकंद ४00 केव्ही उपकेंद्रात सोमवारी दुपारी १ वाजता तांत्रिक बिघाड झाल्यामुळे महापारेषण कंपनीचे पुणे जिल्ह्यातील २२0 केव्ही व १३२ केव्ही क्षमतेचे २९ अतिउच्चदाब उपकेंद्र बंद पडले.
पुणे : महापारेषण कंपनीच्या लोणीकंद ४00 केव्ही उपकेंद्रात सोमवारी दुपारी १ वाजता तांत्रिक बिघाड झाल्यामुळे महापारेषण कंपनीचे पुणे जिल्ह्यातील २२0 केव्ही व १३२ केव्ही क्षमतेचे २९ अतिउच्चदाब उपकेंद्र बंद पडले. परिणामी शहरातील काही भागांसह पिंपरी-चिंचवड, भोसरी तसेच चाकण, सणसवाडी, रांजणगाव एमआयडीसीसह ग्रामीण भागातील काही शहरे व गावांमध्ये दुपारी २३ मिनिटे ते सव्वा तासापर्यंत वीजपुरवठा खंडित झाला होता.
महापारेषणच्या लोणीकंद ४00 केव्ही उपकेंद्रात दुपारी १.0६ वाजता तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे या उपकेंद्रातून वीजपुरवठ्यासाठी अवलंबून असणाऱ्या महापारेषण कंपनीच्या तब्बल २९ उपकेंद्रांचासुद्धा वीजपुरवठा बंद पडला. यामध्ये ४00 केव्ही लोणीकंद, चाकण उपकेंद्र तसेच २२0 केव्ही भोसरी, चिंचवड, टेल्को, चाकण इंडस्ट्रिीाल फेज टू, थेऊर, फुरसुंगी, सेरम, मगरपट्टा, रांजणगाव, मुंढवा, गणेशखिंड, एनसीएल, आंबेठाण, मरकळ, सणसवाडी, जॉनडिअर, एस्सार, निओसीम, बेकॉर्ट, व्हर्लपूल, फियाट व कल्याणी या उपकेंद्रांचाही वीजपुरवठा बंद पडला. उपकेंद्रांचा वीजपुरवठा दुपारी २.२७ वाजेपर्यंत सुरू झाला.
>वीजपुरवठा खंडीत झाल्याने पुणे शहरातील प्रामुख्याने नगरस्ता, विश्रांतवाडी, वडगाव शेरी, गणेशखिंड, शिवाजीनगर, औंध, मगरपट्टा, खराडी, मुंढवा, केशवनगर, फुरसुंगी, वाघोली, हडपसर, बंडगार्डन, कोथरूड, वाकड, वारजे, पाषाण, बावधन, सुस रोड, कोंढवा, कात्रज आदी भागांचा वीजपुरवठा एका तासापर्यंत खंडित होता.