आरटीईअंतर्गत प्रवेश प्रक्रिया जाहीर वेळापत्रकानुसार सुरु करण्यास शिक्षण विभागाला अपयश
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2019 07:58 PM2019-02-24T19:58:17+5:302019-02-24T19:58:50+5:30
शिक्षण हक्क कायद्या (आरटीई)अंतर्गत २५ टक्के आरक्षित जागांवर प्रवेश प्रक्रिया जाहीर वेळापत्रकानुसार सुरू करण्यास शिक्षण विभागाला यंदाही अपयश आले आहे.
पुणे : शिक्षण हक्क कायद्या (आरटीई)अंतर्गत २५ टक्के आरक्षित जागांवर प्रवेश प्रक्रिया जाहीर वेळापत्रकानुसार सुरू करण्यास शिक्षण विभागाला यंदाही अपयश आले आहे. ही प्रक्रिया वेळेवर न सुरू करण्याची परंपरा विभागाने यंदाही कायम ठेवली आहे. त्यामुळे पुर्वी जाहीर केल्यानुसार सोमवार (दि. २५) पासून प्रवेश प्रक्रिया सुरू होणार नसून आता दि. ५ मार्च हा मुहुर्त काढण्यात आला आहे.
आरटीई प्रवेश प्रक्रिया वेळेवर सुरू करण्यात शिक्षण विभागाला दरवर्षी अपयश येत आहे. त्यामुळे आरटीई अंतर्गतच्या २५ टक्के राखीव जागा पूर्ण भरल्या जात नाहीत. मागील वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याची घोषणा करून जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात वेळापत्रक जाहीर झाले. त्याचबरोबर २४ जानेवारीपासून प्रत्यक्षात अर्ज भरण्यास सुरुवात केली होती़ त्यानंतर अनेकदा विविध टप्प्यांवर वेळापत्रकात बदल करण्यात आला. त्यामुळे अनेक पालकांनी या प्रक्रियेचा वाट न पाहता नियमित प्रक्रियेतून प्रवेश घेतले. यंदाही हीच स्थिती कायम आहे. जानेवारी महिन्यात प्रक्रिया सुरू करणार असल्याचे विभागाने स्पष्ट केले होते. पण फेब्रुवारी महिन्यात शाळांच्या नोंदणीचे काम सुरू झाले. दि. ८ ते २२ फेब्रुवारीदरम्यान ही नोंदणी होणार होती. त्यानुसार दि. २५ फेब्रुवारी ते ११ मार्च या कालावधीत ऑनलाईन अर्ज भरता येणार होते. तर दि. १४ वे १५ मार्च रोजी पहिली लॉटरी काढण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते.
पण शिक्षण विभागाला हे वेळापत्रक पाळण्यातही अपयश आले आहे. आता शाळांच्या नोंदणीसाठी दि. २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यासाठी आता मार्च महिना उजाडावा लागणार आहे. आरटीईच्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, आता दि. ५ ते २२ मार्च या कालावधीत पालकांना ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर लॉटरी काढून संबंधित शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रवेश मिळेल. त्यामुळे प्रवेशाची पहिली फेरी एप्रिल महिन्यात पुर्ण होईल. पण शिक्षण विभागाने नव्याने दिलेल्या वेळापत्रकानुसार तरी प्रक्रिया सुरू होणार का, याबाबत पालकांमध्ये साशंकता व्यक्त केली जात आहे.
शहरातील बहुतेक इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळांची पुर्व प्राथमिक व इयत्ता पहिलीचे प्रवेश प्रक्रिया पुर्ण झाली आहे. या शाळांनी आरटीईसाठी नियमानुसार जागा रिक्त ठेवल्या आहेत. मात्र, आरटीईअंतर्गत प्रवेशासाठी पात्र असलेल्या सर्वच विद्यार्थ्यांना इच्छित शाळेमध्ये प्रवेश मिळणे शक्य नाही. त्यामुळे अनेक पालकांनी या प्रक्रियेची वाट न पाहता नियमित प्रक्रियेत प्रवेश घेतले आहेत. तर काही पालक अद्यापही प्रतिक्षेत असून प्रवेश मिळणार की नाही, याची भीती सतावत असल्याचे एका पालकाने सांगितले.