ठेवी देण्यास टाळाटाळ केल्याने ‘डीएसकें’ना दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:11 AM2021-03-17T04:11:34+5:302021-03-17T04:11:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कंपनीमध्ये मुदत ठेवी स्वरुपात ठेवलेल्या तीन लाखांच्या दोन ठेवी परिपक्व झाल्यानंतरही गुंतवलेली रक्कम, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कंपनीमध्ये मुदत ठेवी स्वरुपात ठेवलेल्या तीन लाखांच्या दोन ठेवी परिपक्व झाल्यानंतरही गुंतवलेली रक्कम, तसेच व्याज देण्यास कसूर केल्याप्रकरणी डी. एस. कुलकर्णी अॅन्ड ब्रदर्स कंपनीला न्यायालयाने दणका दिला. तक्रारदाराला सहा लाखांची रक्कम बारा टक्के व्याजदराने निकालाची प्रत मिळाल्यापासून ४५ दिवसांच्या आत देण्याचा आदेश ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दिला आहे.
आयोगाचे अध्यक्ष जे. व्ही. देशमुख, सदस्य शुभांगी दुनाखे आणि अनिल जवळेकर यांनी हा निकाल दिला.
वरद सुशील पटवर्धन यांनी डी. एस. कुलकर्णी अॅन्ड ब्रदर्स व दिलीप सखाराम कुलकर्णी यांच्या विरोधात दावा दाखल केला होता. त्यांनी डी. एस. कुलकर्णी अॅन्ड ब्रदर्स कंपनीमध्ये ३० मे व १२ सप्टेंबर २०१४ रोजी तीन लाखांच्या दोन मुदत ठेवी वार्षिक बारा टक्के व्याजदराने तीन वर्षांकरिता गुंतविल्या.
ठेवी परिपक्व झाल्यानंतर तक्रारदारांना गुंतवलेल्या रकमेवरील व्याजाचा धनादेश देण्यात आला. मात्र, जाबदारांनी तो लगेच मागून घेतला. त्यानंतर, पटवर्धन यांनी गुंतविलेली रक्कम मागितली असता जाबदार यांनी प्रतिसाद दिला नाही. याप्रकरणी, त्यांनी ग्राहक आयोगाकडे धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार तक्रारदाराला मुदतीत रक्कम न दिल्यास पुढील कालावधीसाठी सहा लाख रुपयांसाठी वार्षिक पंधरा टक्के व्याज आकारण्यात येईल. तसेच, तक्रारदारांना दहा हजार नुकसानभरपाई, तर तक्रार अर्जाचा खर्च म्हणून पाच हजार रुपये देण्याचे आदेश आयोगाने दिले.