ससून रुग्णालयाला पर्याय देण्यास अपयश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2015 12:00 AM2015-05-01T00:00:05+5:302015-05-01T00:00:05+5:30
महाराष्ट्रात खासगी मल्टिस्पेशॅलिटी रुग्णालयांचे प्रस्थ वेगाने वाढत असतानाच दुसरीकडे शासकीय रुग्णालयांची स्थिती दिवसेंदिवस खालावत चालली आहे.
पुणे : महाराष्ट्रात खासगी मल्टिस्पेशॅलिटी रुग्णालयांचे प्रस्थ वेगाने वाढत असतानाच दुसरीकडे शासकीय रुग्णालयांची स्थिती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. राज्यशासनाचे मोठे रुग्णालय असलेल्या पुण्यातील ससूनच्या धर्तीवर राज्यात मोठी रुग्णालये उभारण्यात अजूनही राज्यशासनाला यश आलेले नाही. त्यामुळे राज्यभरात मोफत उपचारांसाठी गरीब, मध्यमवर्गीय रुग्णांची फरपट होत आहे. त्यामुळे केवळ पश्चिम महाराष्ट्रातूनच नव्हे, तर विविध भागांमधून रुग्ण ससूनमध्ये येत आहेत. ‘गरिबांचा वाली’ असे बिरुद मिरवणारे शासन खरोखरच सर्वसामान्यांच्या आरोग्यासाठी सक्षम
सरकारी रुग्णालये कधी उभारणार, हा प्रश्न निर्माण होत आहे.
आयटी, आॅटोमोबाईल, शिक्षण आदी क्षेत्रांत ‘नंबर वन’ असलेल्या महाराष्ट्रात सार्वजनिक आरोग्यसेवा मात्र दिवसेंदिवस खालावत चालल्याचे चित्र आहे. परकीय गुंतवणुकीसाठी राज्यशासनाकडून जेवढे प्रयत्न केले जात आहेत, तेवढे प्रयत्न सार्वजनिक आरोग्यसेवा सक्षम करण्यासाठी केले जात नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे आज राज्यात उपचारांअभावी मृत्यू होणाऱ्या गरीब रुग्णांची संख्या मोठी आहे.
पुण्यात ससून हे एक मोठे रुग्णालय असून, तेथे विविध आजारांवर मोफत उपचार केले जातात. त्यामुळे केवळ पश्चिम महाराष्ट्रातूनच नव्हे, तर ठाणे, गडचिरोली, नंदूरबार आदी आदिवासी जिल्ह्यांपासून
इतर जिल्ह्यांमधील रुग्ण दररोज
शेकडो किमीचा प्रवास करून ससूनमध्ये येतात. मात्र, ससूनची क्षमता मर्यादित असल्याने दररोज वाढत्या रुग्णसंख्येचा ताण ससूनवर येत आहे. (प्रतिनिधी)
1रुग्णांचा हा लोंढा थोपविण्यासाठी वेळोवळी शासनाने प्रत्येक जिल्ह्यात ससूनसारखी मोठी रुग्णालये बांधण्याच्या घोषणा केल्या; मात्र त्या केवळ घोषणाच राहिल्या आहेत.
2काही जिल्ह्यांत अशी रुग्णालये उभे राहिलीसुद्धा. मात्र, या इमारतींमध्ये अत्याधुनिक मशिन्स, डॉक्टर, कर्मचाऱ्यांची वानवा दिसून येत आहे. त्यामुळे या इमारती ‘पांढरा हत्ती’ ठरू लागल्या आहेत.
3जिल्ह्यात असलेली जिल्हा रुग्णालयांची अवस्थाही दयनीय आहे. अत्याधुनिकतेची, तज्ज्ञ-अनुभवी डॉक्टरांची, कर्मचाऱ्यांची वानवा हे या रुग्णालयांमधील वास्तव आहे. त्यामुळे मोफत उपचारासाठी आजही रुग्णांना ससून या शासकीय रुग्णालयाशिवाय पर्याय राहिलेला नाही.