मनुष्यबळाअभावी गुन्हेगारी रोखण्यात सपशेल अपयश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 11:23 PM2018-08-31T23:23:53+5:302018-08-31T23:24:04+5:30
पोलिसांवर कामाचा अतिरिक्त ताण : ७0 गावे, औद्योगिक वसाहत असून ६६ पोलीस कर्मचारी
शिवाजी आतकरी
खेड : औद्योगिक वसाहतीमुळे चाकण बकाल झाले. गुन्हेगारीचे माहेरघर बनलेल्या चाकणचे सामाजिक स्वास्थ्य टिकवण्यात पोलीस यंत्रणा सपशेल अपयशी ठरली. मनुष्यबळाअभावी व कामाच्या अतिरिक्त ताणामुळे पोलीस गुन्हेगारीस आळा घालू शकत नाही. पोलिसांच्या अपयशामुळे चाकण क्षेत्रात सामाजिक स्वास्थ्याचा प्रश्न मात्र गंभीर होत चालला आहे.
चाकण पोलीस ठाण्यांतर्गत ७० गावे येतात. या गावांची लोकसंख्या ३ लाखांपेक्षा अधिक आहे. पोलीस खात्याच्या सूत्रानुसार दर हजार लोकसंख्येमागे एक पोलीस, असे गणित असायला हवे. प्रत्यक्षात मात्र चाकण पोलीस ठाण्यात ६६ पोलीस कर्मचारी नियुक्तीस आहेत. प्रचंड मोठे औद्योगिक क्षेत्र, त्या अनुषंगाने वाढलेली लोकसंख्या, परप्रांतीयांची लक्षणीय लोकसंख्या, औद्योगिक क्षेत्रातील माथाडी, विविध ठेकेदारीतून वाढलेली गुंडागर्दी, औद्योगिक वसाहतीतील चोऱ्या, बलात्कार व विनयभंगासारखे गुन्हे आणि खून- मारामाºया यावर नियंत्रण राखण्यात पोलीस अपयशी ठरत आहेत.
तीन लाखांवर लोकसंख्येसाठी केवळ ६६ पोलीस हे समीकरणच मुळी हास्यास्पद आहे. अकरा महिला कर्मचारी मात्र एकही महिला पोलीस अधिकारी नाही, हेही अनाकलनीय आहे. कारण विनयभंग, बलात्काराचे गुन्हे चाकण हद्दीत जास्त आहेत. गतवर्षी १३०० गुन्ह्यांची नोंद येथे झाली. या वर्षी आॅगस्टमध्येच हा आकडा आठशेच्या जवळ पोहोचला आहे. गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण लक्षात घेता, मनुष्यबळ, सोयीसुविधा वाढवणे आवश्यक आहे; अन्यथा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहणार हे तितकेच खरे!
चाकणमधील वाहतूककोंडीचा जटिल प्रश्न आणि त्यासाठी वापरले जाणारे मनुष्यबळ तास सध्या व्यर्थ जात आहे. अतिक्रमणे, वाहनचालकांची बेशिस्ती यांमुळे मनुष्यतासांचा मोठा अपव्यय होत आहे. व्यस्त पोलिसांमुळे गुन्हेगारी रोखणे, गुन्ह्यांची उकल करणे हे पोलिसांपुढे मोठे आव्हान आहे. विविध प्रकारचे गुन्हे, गुन्ह्यांची संख्या लक्षात घेता पोलिसांना अधिक सोयीसुविधा पुरवणे ही गरज निर्माण झाली आहे. दुसºया बाजूला पोलिसांनीही आपला दबदबा निर्माण करायला हवा. पोलिसांची बिले, सुविधा याबाबत शासनाने काळजीपूर्वक उपाययोजना तातडीने करायला हव्यात; अन्यथा चाकण पोलीस कायम तणावाखाली राहणार, क्रयशक्ती घटणार, गुन्हेगारी वाढणार हेही तितकेच खरे. सद्रक्षणाय खलनिग्रहणाय हे बिरुद सार्थ ठरविण्यासाठी पोलीस दलाचे सोयीसुविधांच्या अनुषंगाने आमूलाग्र बदल शासनपातळीवरून करणे गरजेचे असल्याचे चाकण पोलीस ठाण्यावरून दिसते.
नवीन पोलीस ठाण्याचे काय?
गस्तीसाठी दोन चारचाकी, पाच दुचाक्या या ठाण्यात उपलब्ध असल्यातरी सत्तर गावांसाठी त्या पुरेशा नाहीत. औद्योगिक वसाहत, शेलपिंपळगाव, आंबेठाण, पाईट, चाकण, वाड्या, चाकण असे मोठे बीट आणि येथील गुन्हेगारी लक्षात घेता मनुष्यबळाचा प्रश्न महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे दाखल झालेल्या गुन्ह्यांची उकल किती आणि कशी होते, हाही मोठा प्रश्नच आहे. एमआयडीसीसाठी स्वतंत्र पोलीस ठाणे प्रस्ताव शासनदरबारी महिनोन्महिने प्रलंबित आहे. चाकण पोलीस ठाण्यावरील ताण कमी करण्यासाठी एमआयडीसी पोलीस ठाणे उत्तम उपाय असला तरी नवीन पोलीस ठाण्याचा विषय मार्गी लागत नाही, हे दुर्दैव आहे.