‘व्हिसल ब्लोअर’ मतेंच्या बदलीचा प्रयत्न निष्फळ : पुणे विद्यापीठ प्रशासनाला चपराक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2019 06:00 AM2019-05-18T06:00:00+5:302019-05-18T06:00:05+5:30
‘व्हिसल ब्लोअर’ म्हणून कौतुक केलेल्या लिपिकांची प्रशासनाने आचारसंहिता सुरू असताना तडकाफडकी अहमदनगरला बदली केली होती
पुणे : निवृत्त न्यायाधीशांच्या समितीने विद्यापीठातील गैरप्रकार उजेडात आणल्याप्रकरणी ‘व्हिसल ब्लोअर’ म्हणून कौतुक केलेल्या लिपिकांची प्रशासनाने आचारसंहिता सुरू असताना तडकाफडकी अहमदनगरला बदली केली होती. मात्र, ही बदली नियमबाहय पध्दतीने झाली असून याप्रकरणी नियमानुसार कार्यवाही करण्याचे आदेश उच्च शिक्षण विभागाने दिले आहेत. यामुळे विद्यापीठ प्रशासनाला चपकार बसल्याचे मानले जात आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील नामदेव अध्यासनामध्ये कार्यरत लिपिक सुनिल मते यांची अचानक नगरला बदली करण्यात आली. मते यांनी या बदलीवर आक्षेप घेऊन उच्च शिक्षण विभागाचे संचालक धनराज माने यांच्याकडे दाद मागितली.
उच्च शिक्षण विभागाने मते यांचे म्हणणे ग्राहय धरले आहे. ‘‘सुनिल मते हे शासनमान्य अनुदानित पदावर कार्यरत असताना त्यांची नगर येथील विनाअनुदानित पदावर बदली करण्यात आली. ही कार्यवाही प्रशासकीयदृष्टया नियमबाहय आहे आहे,’’ असे उच्च शिक्षण विभागाने पुणे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांना कळवले आहे.
विद्यापीठातील गैरप्रकारांविरूध्द सातत्याने आवाज उठणाऱ्या मते यांनी माहिती अधिकाराचा वापर अनेक गैरप्रकार आजवर उजेडात आणले आहेत. प्रशासन विभागाचे उपकुलसचिव प्रदीप कोळी यांची पात्रता पूर्ण नसताना त्यांची या पदावर नियुक्ती झाल्याचे त्यांनी उजेडात आणले. याप्रकरणी निवृत्त न्यायाधीश जी. डी. तळवळकर यांची समिती नेमण्यात आली होती. ‘‘मते हे ‘व्हिसल ब्लोअर’ म्हणून चांगले काम करीत आहेत. जिथे चुकते आहे, ते उजेडात आणणे हे त्यांचे सजग कर्मचारी म्हणून कामच आहे,’’ या शब्दात तडवळकर समितीने त्यांची दखल घेतली होती.
पदनाम भरती गैरव्यवहार, एमबीए विभागातील आर्मी ऑफिसरचा कोटा बंद करणे, शासनमान्य अनुदानित पदे रिक्त ठेऊन त्या पदांना समकक्ष पदे गैरपध्दतीने निर्माण करणे, आरोग्य केंद्रातील अनागोंदी अशी अनेक प्रकरणे मते यांनी चव्हाट्यावर आणली आहेत. संबंधितांवर कारवाई व्हावी म्हणूनही त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला.
...................
माहिती मागत असल्याने ‘रडार’वर
इंग्रजी विभागात नुकत्याच दोघा सहायक प्राध्यापकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. या नियुक्त्या वशिलेबाजीतून करण्यात आल्याची तक्रार पात्रताधारक उमेदवार किरण मांजरे व राज नेरकर यांनी केली होती. याप्रकरणी सुनिल मते यांनी मुलाखत दिलेल्या सर्व उमेदवारांना मिळालेल्या गुणांची माहिती मागितली होती. या माहिती अर्जामुळे त्यांची बदली केल्याची चर्चा विद्यापीठ वर्तुळात रंगली होती.