श्रद्धेचा केवळ बुरखा पांघरलाय - वैभव मांगले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 03:35 AM2019-03-18T03:35:54+5:302019-03-18T03:36:29+5:30
‘देव अस्तित्वात नाही, हे पुजाऱ्याला माहीत असते. त्यांच्यासाठी हे केवळ पैसे कमावण्याचे साधन आहे. म्हणूनच हे लोक सामान्य माणसाला देवपूजेच्या आहारी घालून गडगंज श्रीमंत होतात.
पुणे : ‘देव अस्तित्वात नाही, हे पुजाऱ्याला माहीत असते. त्यांच्यासाठी हे केवळ पैसे कमावण्याचे साधन आहे. म्हणूनच हे लोक सामान्य माणसाला देवपूजेच्या आहारी घालून गडगंज श्रीमंत होतात. आज कुठल्याही मोठ्या देवस्थानचे ट्रस्टी हे सर्व नास्तिक लोक आहेत. अशा लोकांनी फक्त श्रद्धेचा बुरखा पांघरलेला आहे,’ असे परखड मत अभिनेते वैभव मांगले यांनी व्यक्त केले. शहीद भगतसिंग विचार मंचातर्फे आयोजित सहाव्या नास्तिक मेळाव्यात ते बोलत होते.
‘अज्ञान मान्य करणे हा विज्ञानाचा आधार आहे. धर्म मात्र अज्ञानच मान्य करायला तयार नाही. ज्या देवस्थानाला मोठमोठे व्यापारी लोक जातात आणि पार्टनरशिपमध्ये बोली लावतात, ते देवाला चालतं का? जीवनातील प्रत्येक गोष्टीत तर्क असतो. तो शोधायला आपण लोकांना प्रवृत्त केले पाहिजे’, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. लेखक डॉ. शंतनू अभ्यंकर, इतिहास अभ्यासक डॉ. टी. एस. पाटील, अभ्यासक य. ना. वालवनकर या वेळी उपस्थित होते.
गाय मारली म्हणून माणसाची हत्या...
मांगले म्हणाले, ‘आज आपण खूप असहिष्णू होत चाललो आहोत. विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात दाभोलकरांची हत्या होते. तिथे आपण काहीच करू शकलो नाही आहोत. एक गाय कोणीतरी मारली, असा संशय घेऊन एका माणसाची हत्या केली जाते. ज्या गाई रस्त्यावर फिरून मिळेल ते खातात, पोटात प्लॅस्टिक अडकून त्यांचा मृत्यू होतो, त्यांच्याविषयी यांना काहीच वाटत नाही. पण कुठल्यातरी धर्मातल्या माणसाने गाय मारली, म्हणून त्यांची हत्या केली जाते, हा खूप लाजिरवाणा प्रकार आहे.’