पुण्यातील शाळांना सीबीएसई मान्यतेचे बनावट प्रमाणपत्र तब्बल १२ लाखांना विकले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2023 10:29 AM2023-01-10T10:29:37+5:302023-01-10T10:29:47+5:30
मंत्रालयातील अधिकार्यांच्या बनावट स्वाक्षर्या करुन हे प्रमाणपत्र शाळांना विकल्याचे शिक्षण विभागाच्या चौकशीतून समोर
पुणे : शहरातील शााळांना सीबीएसई अभ्यासक्रमाशी संलग्न करण्याबाबतचे बनावट ना हरकत प्रमाणपत्र तयार केल्याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ मंत्रालयातील अधिकार्यांच्या बनावट स्वाक्षर्या करुन हे प्रमाणपत्र शाळांना तब्बल १२ लाख रुपयांना विकल्याचे शिक्षण विभागाच्या चौकशीतून समोर आले आहे.
याबाबत जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकारी सुनंदा वाघमारे (वय ४३) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बनावट ना हरकत प्रमाणपत्र तयार केलेल्या अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य मंडळाव्यतिरिक्त इतर मंडळाच्या शाळांना राज्य शासनाचे ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागते. हे प्रमाणपत्र घेतल्याशिवाय सीबीएसई बोर्डाच्या शाळा महाराष्ट्रात सुरु करता येत नाही. परंतु, काहीनी दुसर्याच एका शाळेचा इनवर्ड नंबर टाकून पुण्यातील संस्थाचालकांना बनावट प्रमाणपत्र दिल्याचे चौकशीत उघड झाले आहे.
पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागात क्रिएटिव्ही एज्युकेशन सोसायटी संचलित पब्लिक स्कुल अँड ज्युनिअर कॉलेज, एम पी इंटरनॅशनल स्कुल अँड ज्युनिअर स्कुल, एज्युकेशनल करिअर फाऊंडेशन संचलित नमो आर आय एम एस या शाहा आणि कनिष्ठ महाविद्यालये सीबीएसई अभ्यासक्रमांशी संलग्न करण्याबाबत १४ जुलै २०२२ पूर्वी बनावट ना हरकत प्रमाणपत्र सादर करुन फसवणूक केल्याचे शिक्षणाधिकारी सुनंदा वाघमारे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़.