‘महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदे’च्या उपायुक्तांच्या नावे बनावट प्रमाणपत्र; महिलेसह अन्य दोघांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2024 11:18 AM2024-07-06T11:18:54+5:302024-07-06T11:19:29+5:30
या प्रकरणी तिघांविरोधात डेक्कन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी बनावट प्रमाणपत्र तयार का केले, या दृष्टीने तपास करण्यात येत आहे....
पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या उपायुक्तांच्या नावे बनावट प्रमाणपत्र तयार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणी तिघांविरोधात डेक्कन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी बनावट प्रमाणपत्र तयार का केले, या दृष्टीने तपास करण्यात येत आहे.
याप्रकरणी अश्विनी सतीश शिंदे उर्फ अश्विनी कैलास गवते (३३, रा. साकुर, ता. संगमनेर, जि. अहमदनगर), सहदेव निंभोरे (रा. साकू, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) आणि नीलेश राठोड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत परीक्षा परिषदेचे उपायुक्त संजयकुमार राठाेड (४८) यांनी डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संगमनेर भागातील एका महिलेने परीक्षा परिषदेच्या उपायुक्त कार्यालयात प्रमाणपत्र सादर केले. तपासणीत प्रमाणपत्र बनावट असल्याचे उघडकीस आले.
प्रमाणपत्रावर बनावट शिक्का, तसेच राठोड यांची बनावट स्वाक्षरी करण्यात आल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी संबंधित महिलेला चौकशीसाठी बोलावले. चौकशीत आरोपी सहदेव निंभोरे, नीलेश राठोड यांनी प्रमाणपत्र दिल्याचे महिलेने सांगितले. त्यानंतर पोलिसांनी महिलेसह निंभोरे, राठोड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपींनी बनावट प्रमाणपत्र तयार का केले, प्रमाणपत्राचा वापर शिक्षक भरतीत करण्यात येणार होता का, या दृष्टीने तपास करण्यात येत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक महेश भोसले करत आहेत.