बनावट प्रमाणपत्र घोटाळा : २ हजार ७०० जणांना प्रमाणपत्र दिल्याचे उघडकीस

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2023 09:18 PM2023-05-09T21:18:03+5:302023-05-09T21:18:08+5:30

बनावट प्रमाणपत्रासाठी त्याने काढली २१ सेंटर

Fake Certificate Scam 2700 Certificates Revealed pune mba student sayed imran | बनावट प्रमाणपत्र घोटाळा : २ हजार ७०० जणांना प्रमाणपत्र दिल्याचे उघडकीस

बनावट प्रमाणपत्र घोटाळा : २ हजार ७०० जणांना प्रमाणपत्र दिल्याचे उघडकीस

googlenewsNext

पुणे : एमबीएचा विद्यार्थी असलेल्या सैय्यद इम्रान सैय्यद इब्राहीम याने बनावट वेबसाईट तयार करुन त्याची बनावट प्रमाणपत्र देण्यासाठी तब्बल १५ एजंटांची नेमणूक केली होती. त्यासाठी त्याने २१ ठिकाणी सेंटर सुरु केली होती. त्याच्याकडील लॅपटॉपचा तपास करता, त्याने आतापर्यंत तब्बल २ हजार ७०० हून अधिक बनावट प्रमाणपत्रे दिल्याचे उघडकीस आले आहे.

पुणे पोलिसांनी दोन वर्षांपूर्वी शिक्षक पात्रता परिक्षा (टीईटी) घोटाळा उघडकीस आणला होता. त्यात बनावट प्रमाणपत्र मिळविलेल्या ७ हजार ८०० जणांचे प्रमाणपत्र रद्द करण्यात आले होते. त्यानंतर हा आणखी एक मोठा घोटाळा पुणे पोलिसांनी उघडकीस आणला आहे.
संदीप ज्ञानदेव कांबळे (रा. सांगली), कृष्णा सोनाजी गिरी (रा. बिडकीन, संभाजीनगर), अल्ताफ शेख (रा. परांडा, जि. धाराशिव), सैय्यद इम्रान सैय्यद इब्राहीम (रा. संभाजीनगर) यांना अटक केली आहे.

याबाबत पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी सांगितले की, सय्यद हा त्यांचा मास्टर माईंड असून तो स्वत: एमबीए झालेला आहे. त्याने यु ट्युबवर पाहून हा फसवणुकीचा फंडा तयार केला आहे. त्यासाठी त्याने दोन फेक वेबसाईट तयार केल्या. छत्रपती संभाजीनगर येथे महाराष्ट्र स्टेट ओपन स्कुल आणि ए१ हिंद युनिर्व्हसिटी अशा वेबसाईट तयार केल्या. ओपन स्कुल च्या नावाने तो १० वी, १२ वीचे प्रमाणपत्र देत तर, पदवी व इतर प्रमाणपत्रे ए१ हिंद युनिर्व्हसिटीच्या नावाने देत असत. त्याच्या लॅपटॉपमध्ये कोणा कोणाला प्रमाणपत्रे दिली, त्यांची फक्त नावे आहेत.

१० वी पासपासून पदवी, आयटीपर्यंतचे प्रमाणपत्र

सय्यद याने एजंटांना हाताशी धरुन मराठवाडा, सांगली, सातारा, पुणे शहर व जिल्ह्यातील तरुणांशी संपर्क साधला. त्यांना लागत असलेले १० वी पास पासून १२ वी पास, आर्ट, कॉमर्स, विज्ञान याची पदवी, आयटीआय, आय टी अशी प्रमाणपत्रे दिली.


जितके मार्क पाहिजे तसे पैसे?

हे बनावट प्रमाणपत्र देताना त्याने आपल्या लॅपटॉपमध्ये एक प्रोग्रामच तयार केल्याचे दिसून आले. ज्यांना काठावर पास झाल्याचे प्रमाणपत्र पाहिजे, त्यांना ३० हजार रुपये, ज्यांना अधिक मार्कचे प्रमाणपत्र पाहिजे, त्यानुसार त्याचे पैसे वाढत होते. त्यानुसार ३० हजारापासून ५० हजारांपर्यंत पैसे घेतले जात होते.

बाहेर कसे आले?

याबाबत पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी सांगितले की, पोलीस भरती सुरु असताना अशा प्रकारे १० वी, १२ वीचे बनावट प्रमाणपत्र दिले जात असल्याची कुणकुण लागली होती. त्यातूनच सांगली परिसरातून ही माहिती मिळाली. त्यातून दिलीप कांबळे हा एजंट हाताशी लागला. त्याच्याकडे काही प्रमाणपत्रे मिळाली. त्यावरुन ही लिंक समोर आली. आतापर्यंत चौघांना अटक करण्यात आली आहे. आणखी १५ जणांनी नावे समजली आहेत.

कशी करत होते फसवणूक

सय्यद याचे एजंट ज्यांना गरज आहे. त्यांना गाठत, बनावट प्रमाणपत्र मिळवून तो असे सांगून त्यांच्याकडून माहिती घेत. त्यानंतर ती माहिती ते सय्यदला देत. सय्यद त्यांना पाहिजे असलेले प्रमाणपत्र बनवून पाठवत असे. त्यानंतर त्यांना वेबसाईटची लिंक देत असे. एजंट प्रमाणपत्र देताना संबंधिताला लिंक देत. संबंधित लाभार्थी ती लिंक ओपन करुन पहात. त्यावेळी त्याला स्वत:चे प्रमाणपत्र त्यावर दिसत. त्यामुळे त्याला ते खरे वाटत असे.

विशेष पथक स्थापन करणार

हा खूप मोठा तपास असून त्यासाठी विशेष तपास पथकाची स्थापन करण्यात येणार आहे. या पथकाकडे यातील वेगवेगळ्या बाबींचा तपास सोपविला जाणार आहे.

Web Title: Fake Certificate Scam 2700 Certificates Revealed pune mba student sayed imran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.