बनावट नोटा छापणाऱ्यांचा पर्दाफाश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 12:09 AM2019-01-19T00:09:58+5:302019-01-19T00:10:08+5:30
दोन महिलांसह पाच अटकेत; सव्वाचार लाखांच्या बनावट नोटा जप्त
पुणे : तमिळनाडूमधे बनावट नोटा छापून त्या वेगवेगळ्या शहरांमध्ये चलनात आणणाºया एका बड्या रॅकेटचा पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. यात दोन महिलांसह सहा जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून सव्वाचार लाखांच्या बनावट चलनी नोटा जप्त केल्या आहेत.
राजेश चंद्रभान ढिलोड (वय ४५, रा. रामवाडी पोलीस चौकीसमोर, नगर रोड), अलका रोहिदास क्षीरसागर (वय ४४, रा. ताडीवाला रोड), आनंद यशवंत जाधव (वय ३६, रा. मंचर), त्याची पत्नी सुनीता आनंद जाधव (वय ३०) व व्यंकटेश सुब्रमण्यम मुदलीयार (वय ४४, रा. तमिळनाडू) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर, श्रीहरी नायर हा पसार झाला आहे. गुन्हे शाखेच्या युनिट दोनमधील सहायक फौजदार अनिल ऊसुलकर यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, ढोले पाटील रस्त्यावर एक महिलेसह दोघे बनावट नोटा चलनात आणण्यासाठी येणार आहेत. त्यानुसार, पोलीस आयुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक गजानन पवार, अतुल गायकवाड व त्यांचे पथकाने याठिकाणी सापळा रचून राजेश ढिलोड व अलका क्षीरसागर या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याजवळील २ हजारांच्या ५५ व ५०० रुपयांच्या १०४ अशा एकून १ लाख ६२ हजारांच्या बनावट नोटा जप्त केल्या.
तपासादरम्यान आनंद व त्याची पत्नी सुनीता यांची नावे समोर आली. त्यानुसार त्यांना अटक केली. त्यांच्या घराची झडती घेतली असता २४ हजारांच्या बनावट नोटा सापडल्या. चौघांकडील चौकशीत व्यंकटेश मुदलीयार व श्रीहरी नायर हे दोघे तमिळनाडूत बनावट नोटा छापून येथे चालविण्यासाठी पाठवित असल्याचे निष्पन्न झाले. एक पथकाने आंध्र प्रदेशातील चेन्नै गावात जाऊन व्यंकटेश याच्या घरावर मध्यरात्री छापा टाकला. त्यावेळी आरोपी बनावट नोटा छापत असल्याचे स्पष्ट झाले. नोटा छापण्यासाठी लागणारे सर्व साहित्य आणि छापलेल्या २ लाख ३५ हजारांच्या बनावट नोटा जप्त केल्या.
मुदलीयार हा श्रीहरी शिवाय इतर कोणाच्या संपर्कात नव्हता. श्रीहरी पुण्यातील अटक आरोपींना बनावट नोटा देत. ताडीवाला परिसरात आरोपी किरकोळ वस्तू खरेदी करून या नोटा चलनात आणत होते. तर, मंचर परिसरातही पती-पत्नी आठवडी बाजारात बनावट नोटा चलनात आणत. नोव्हेंबर महिन्यापासून हा प्रकार होता. त्याने आतापर्यंत साधारण दहा लाख बनावट नोटा चलनात आणल्या असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
यूट्युबवर पाहून तयार केल्या नोटा
व्यंकटेश हा मुळचा पुण्यातील असून तो रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर खून, मारामारी, पेट्रोल भेसळ यासह गंभीर गुन्हे दाखल आहेत. जामिनावर आल्यापासून तो फरार आहे. ट्रकच्या व्यवसायात नुकसान झाल्याने त्याने बनावट नोटा छापण्याचा प्लॅन केला होता. त्यानुसार तो यूट्युुबवर पाहून नोटा तयार करू लागला. त्यावेळी तो श्रीहरीच्या संपर्कात होता. तो श्रीहरीकडे बनावट नोटा आणून देत. एक लाख रुपयांच्या बनावट नोटांच्या बदल्यात तो खरे ४० हजार रुपये घेत. दर पंधरा दिवसांनी तो पैसे येऊन पुण्यात देत असल्याचे समोर आले आहे.