वकील असल्याचे भासवत बनावट दस्त नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:14 AM2021-09-10T04:14:41+5:302021-09-10T04:14:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : वकील असल्याचे भासवत बनावट दस्त नोंदणी करून शासनासह बिल्डर आणि फ्लॅटधारकांची फसवणूक केल्याप्रकरणी पती-पत्नीचा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : वकील असल्याचे भासवत बनावट दस्त नोंदणी करून शासनासह बिल्डर आणि फ्लॅटधारकांची फसवणूक केल्याप्रकरणी पती-पत्नीचा अटकपूर्व जामीन जी. जी. कोर्टाने फेटाळला.
प्रसन्न अरुण शिरूडकर (वय ४८) आणि शर्वरी प्रसन्न शिरूडकर (वय ४६, दोघे रा. अँड्रसेस सोसायटी, मोशी) अशी जामीन फेटाळलेल्या पती-पत्नींची नावे आहेत. याप्रकरणी अमित दत्तात्रय घुले (वय ४२, रा. कमल स्मृती मांजरी बुद्रुक, ता. हवेली) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे २८ एप्रिल रोजी दुय्यम निबंधक कार्यालय हवेली क्र. २५, दापोडी येथे ओळखीच्या वकिलाला भेटावयास गेले असता शिरूडकर दांपत्याशी त्यांची ओळ्ख झाली. त्यांनी फिर्यादीशी ओळख वाढवून तुमचे दस्त करून देतो, असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. दोघेही वकील नसतानाही त्यांनी वकील असल्याचे सांगितले. फिर्यादीच्या मांजरी बुद्रुक येथील शारदा कॉम्प्लेक्स आणि शारदा आर्केड या बिल्डिंगमधील १३ फ्लॅटची नोंदणी करून देतो, असे सांगून फिर्यादीकडून सातबारा उतारा आणि फ्लॅट विक्रीचे मूळ दस्त घेऊन ७ फ्लॅटचे १८ व १९ एप्रिल दोनच दिवसांत दुय्यम निबंधक कार्यालय हवेली क्र. २५, दापोडी येथे बनावट रेरा व पीएमआरडीए नोंदणीची कागदपत्रे बनवली आणि नोंदणी केली. फिर्यादीसह शासनाची १३ लाख ८ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पती-पत्नीविरुद्ध भोसरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांनी अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी कोर्टात अर्ज केला होता. मात्र, सरकारी वकील प्रेमकुमार अगरवाल यांनी जामिनास विरोध केला. दोघेही वकील नाहीत, तरीही वकील असल्याचे भासवत शर्वरी शिरूडकर यांनी दस्तावर वकील म्हणून स्वाक्षरी करीत रेरा आणि पीएमपीआरडीएकडील बनावट कागदपत्रे तयार करून ती खरी आहेत, असे भासवले आणि दस्त नोंदणीसाठी त्याचा वापर केला. फिर्यादीच्या प्रकल्पाला रेरा नोंदणी नसतानाही बनावट नोंदणी क्रमांकाचे नोंदणीपत्र तयार केले. दुय्यम निबंधकांना संशय आल्याने त्यांनी रेरा व पीएमआरडीए कार्यालयात चौकशी केली असता, ही ती कागदपत्रे खोटी व बनावट असल्याचे त्यांनी कळविले, असा युक्तिवाद करीत ॲड. अगरवाल यांनी जामीन फेटाळण्याची मागणी केली. न्यायालयाने ती ग्राह्य धरीत दोघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला.
------------------------------------------