बदल्यांसाठी बनावट कागदपत्रे; संवर्ग १, २ आणि ४ ची बनावट पत्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 05:59 AM2018-06-04T05:59:43+5:302018-06-04T05:59:43+5:30
राज्य शासनाने आॅनलाईन पद्धतीने जिल्ह्यातील जवळपास ६ हजार ४३ शिक्षकांच्या बदल्या केल्या. या बदली प्रक्रियेसाठी शिक्षकांना आॅनलाईन अर्ज भरावा लागणार होता.
- निनाद देशमुख
पुणे : राज्य शासनाने आॅनलाईन पद्धतीने जिल्ह्यातील जवळपास ६ हजार ४३ शिक्षकांच्या बदल्या केल्या. या बदली प्रक्रियेसाठी शिक्षकांना आॅनलाईन अर्ज भरावा लागणार होता. हा अर्ज भरताना शहरालगतच्या तसेच चांगल्या ठिकाणच्या शाळा मिळवण्यासाठी काहींनी बनावट कागदपत्रांचा आधार घेतला असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. राज्य शासनानेही याची गंभीर दखल घेतली असून, अशा शिक्षकांच्या कागत्रपत्रांची तपासणी करून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
बदल्यांमधील घोळ कमी करण्यासाठी राज्य शासनातर्फे या वर्षी आॅनलाईन बदली प्रक्रिया राबविण्यात आली. या बदली प्रक्रियेचा जिल्ह्यातील जवळपास बाराशे शिक्षकांना फटका बसला आहे. ५ हजार ३८८ शिक्षकांच्या झालेल्या बदल्यांपैकी सुमारे ६५५ शिक्षक विस्थापित झाले आहेत.
याबरोबरच, शिक्षकांसह पती-पत्नी एकत्रीकरण, पसंतीच्या
विरोधात मिळालेल्या शाळा अशा अनेक त्रुटी या बदली प्रक्रियेत राहिल्या आहेत. मात्र, काही शिक्षकांनी चांगल्या शाळा मिळाव्या यासाठी संवर्ग १, २, व ४ मधील शिक्षकांच्या बनावट प्रमाणपत्र व बनावट
माहिती सादर केल्याच्या तक्रारी जिल्हा परिषदेकडे आल्या आहेत. विस्थापित शिक्षकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी जिल्हा परिषदेमध्ये या शिक्षकांची बैठक बोलविण्यात आली होती.
या बैठकीत काही शिक्षकांनी चुकीची प्रमाणपत्रे सादर करून चांगल्या ठिकाणी बदल्या मिळवल्याच्या तक्रारी केल्या. बदल्यांच्या पहिल्या फेरीत गुगल मॅपचा चुकीच्या पद्धतीने वापर करून संवर्ग २ मधील पती आणि पत्नी यांनी ३० कि.मी.च्या आत गुगल मॅपिंगद्वारे दाखूनही बनावट प्रमाणपत्राद्वारे बदली मागितली. ही बदली मागताना ३० कि.मी.च्या बाहेरचे गाव मागत सूट मिळवली. काहींनी बनावट अपंग प्रमाणपत्र सादर करून तसेच कुमारिका विधवा परित्यक्ता असल्याचे भासवून बदली प्रक्रियेचा चुकीचा लाभ घेतला. संवर्ग ४मध्ये माहिती भरताना जिल्ह्याबाहेरील शिक्षकांनी जिल्ह्यातील रुजू तारीख न लिहिता ते ज्या जिल्ह्यात
नोकरीला लागले तेथील तारीख लिहिल्याने आधीपासून सेवेने जास्त असणाऱ्या शिक्षकांना त्याचा फटका बसला आहे.
या तक्रारींची शासनानेही गंभीर दखल घेतली आहे. ज्या ठिकाणी शिक्षक रुजू होणार आहेत, त्या ठिकाणी रुजू होण्याआधी त्यांच्या सर्व कागदपत्रांची कसून तपासणी केली जाणार आहे. यात दोषी आढळणाºयांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेला देण्यात आल्या आहेत.
तालुकास्तरावर होणार छाननी
शिक्षकांच्या तक्रारीनुसार तालुकास्तरावर पुन्हा कागत्रपत्रे तपासण्यात येणार आहेत. यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे तसे पत्र आज देण्यात येणार आहे. यात दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई होईल. जिल्हा परिषदेकडे दोन तालुक्यांत तक्रारींचे ३ अर्ज आले आहेत.
शिक्षकांच्या आॅर्डर निघाल्या आहेत. ते रुजू होताना त्यांच्या अर्जांची छाननी गट शिक्षणाधिकाºयांद्वारे करण्यात येणार आहे. तक्रारी जरी आल्या असल्या तरी तपासणीदरम्यान असले काही प्रकार आढळल्यास थेट शासनानेच कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. तसे पत्रही जिल्हा परिषदेला मिळाले असून, असे बोगस शिक्षक आढळल्यास त्यांच्यावर थेट कारवाई करण्यात येईल. - सूरज मांढरे, मुख्य कार्यकारी अधिकारी