Pune: बनावट विदेशी स्कॉच बनवण्याच्या कारखान्याचा पर्दाफाश, १० लाखांचा मुद्देमाल जप्त

By नितीश गोवंडे | Published: January 13, 2024 03:39 PM2024-01-13T15:39:08+5:302024-01-13T15:40:27+5:30

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे...

Fake foreign scotch factory busted, worth Rs 10 lakh seized pune latest news | Pune: बनावट विदेशी स्कॉच बनवण्याच्या कारखान्याचा पर्दाफाश, १० लाखांचा मुद्देमाल जप्त

Pune: बनावट विदेशी स्कॉच बनवण्याच्या कारखान्याचा पर्दाफाश, १० लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे : राज्य उत्पादन शुल्कच्या पुणे विभागाने बनावट विदेशी स्कॉच तयार करणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश करुन दहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला. कात्रज परिसरातील देहू रोड बायपास, आंबेगाव बु. येथे बनावट विदेशी स्कॉच बनवण्याचा कारखाना सुरु होता. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. या कारवाईत महेशभाई हरिभाई कोळी (रा. बालाजी हाईट्स, मंगळवार पेठ, पुणे) याला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि. १२) रात्री करण्यात आली.

देहूरोड बायपास रोड स. नं. ३, आंबेगाव बुद्रुक येथे बनावट विदेशी स्कॉच बनवण्याचा कारखाना सुरु असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क, सी विभागाचे उपअधीक्षक संतोष जगदाळे यांना मिळाली. त्यानुसार पथकाने शुक्रवारी आंबेगाव बु. येथील कारखान्यावर दारुबंदी गुन्ह्यांतर्गत छापा टाकला. या ठिकाणावरुन बनावट विदेशी स्कॉचच्या ३४ सिलबंद बाटल्या, दोन दुचाकी वाहने, ५५१ रिकाम्या बाटल्या, बाटल्यांचे बुच, मोनोकार्टून, हिट गन (हेअर ड्रायर), इंडक्शन (शेगडी), प्लास्टिक पॅकिंग रोल, प्लास्टिक चिकटपट्टी आणि मोबाइल फोन असा एकूण १० लाख ३९ हजार ७४७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या कारखान्यात विदेशी बनावटीचे मद्य वापरण्यात आलेल्या रिकाम्या बाटल्यात पुन्हा मद्य भरून त्याची विक्री केली जात होती. हे मद्य पार्सलद्वारे मुंबई व इतर शहरामध्ये पाठवले जात होते तसेच दुचाकीचा वापर करून पुणे शहरात त्याची विक्री केली जात होती. अशी माहिती अटक करण्यात आलेल्या महेशभाई कोळी याने पथकाला दिली.

ही कामगिरी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर, अधीक्षक चरणसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली उप अधीक्षक संतोष जगदाळे, निरीक्षक आर. पी. शेवाळे, दुय्यम निरीक्षक एन. एन. मारकड, सहाय्यक दुय्यम निरीक्षक एस. एस. लोहकरे, एस. एस. इंदलकर, जवान व वाहनचालक जवान शरद भोर, गोपाल कानडे व महिला जवान उज्वला भाबड यांच्या पथकाने केली. दाखल गुन्ह्याचा तपास राज्य उत्पादन शुल्क, सी विभागाचे निरीक्षक राजाराम प्रभु शेवाळे करत आहेत.

Web Title: Fake foreign scotch factory busted, worth Rs 10 lakh seized pune latest news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.