बनावट नौसेना अधिकाऱ्याला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 09:55 PM2018-07-26T21:55:10+5:302018-07-26T21:58:55+5:30
भारतीय नौसेनेत नोकरीला आहे का असे पोलिसांनी विचारल्यावर त्याने नाही असे सांगितले़. त्याच्या घरात जाऊन झडती घेतली असता घरात नौसेनेचा गणवेश व नौसेनेचे वेगवेगळे बॅचेस आढळून आले़.
पुणे : भारतीय नौसेनेचा गणवेश, बनावट आयकार्ड व बॅच बाळगून फसवणूक करणाऱ्या तरुणाला चतु:श्रृंगी पोलिसांनी अटक केली़.
राजन जनार्दन शर्मा (वय २३, रा़ शैलेश टॉवर, सिद्धार्थनगर, औंध़ मुळ गाव, साऊथ परगणा, प़ बंगाल) असे त्याचे नाव आहे़ त्यांच्याकडून भारतीय नौसेनेचा गणवेश, बॅच, आयकार्ड जप्त करण्यात आले आहेत़ त्याच्यावर या वर्षी हिंजवडी, येरवडा, कोंढवा, बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत़.
याप्रकरणी पोलीस नाईक दादासाहेब काळे यांनी फिर्याद दिली आहे़. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद विरोधी पथकाचे सहायक निरीक्षक विवेक पाटील यांनी गुरुवारी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद ढोमे यांना येऊन माहिती दिली की, राजन शर्मा हा औंध येथील एका सोसायटीत थांबला असून त्याच्याकडे भारतीय नौसेनाचा गणवेश आहे़. तो घालून तो नेहमी फिरत असतो़. या माहितीनुसार सहायक पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, पाटील व त्यांचे सहकारी प्रेम वाघमोरे, गुंड, साळवी, बामगुडे, चोपडे, मुळे हे शैलेश टॉवर येथे गेले़ त्यांनी पार्किंगमध्ये थांबलेल्या राजन शर्मा याच्याकडे चौकशी केली़. त्याची झडती घेतल्यावर त्याच्या खिशात भारतीय नौसेनचे दोन आयकार्ड सापडले़. त्याला भारतीय नौसेनेत नोकरीला आहे का असे पोलिसांनी विचारल्यावर त्याने नाही असे सांगितले़. त्याच्या घरात जाऊन झडती घेतली असता घरात नौसेनेचा गणवेश व नौसेनेचे वेगवेगळे बॅचेस आढळून आले़. पोलिसांनी ते जप्त करुन त्याला अटक केली आहे़ अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक संदेश केंजळे करीत आहेत़.
़़़़़़़
आॅनलाईन कुत्रे विकून फसवणूक
राजन शर्मा हा मुळचा पश्चिम बंगालमधील असून गेल्या काही महिन्यांपासून तो पुण्यात राहतो़. त्याच्यावर यापूर्वी फसवणूकीचे चार गुन्हे दाखल आहेत़. त्याने आपल्याकडे परदेशी जातीचे कुत्रे असल्याचे सांगून इच्छुकांना ते तो विकत असे़. त्यासाठी अगोदर आॅनलाईन त्यांच्याकडून पैसे घेत असत़. मात्र, पैसे मिळाल्यानंतर त्यांना कुत्रा पाठवित नसे़, त्यामुळे लोकांना फसवणूक झाल्याच्या तक्रारी हिंजवडी, येरवडा, कोंढवा, बिबवेवाडी पोलीस ठाण्यात दाखल केल्या होत्या़. जानेवारी २०१८ मध्ये त्याला पोलिसांनी अटकही केली होती़. त्यातून तो जामीनावर सुटला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली़ .