किराणा दुकानदाराला खंडणी मागणाऱ्या तोतया ग्राहक मंच अधिकाऱ्याला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 11:18 PM2020-04-20T23:18:06+5:302020-04-20T23:19:56+5:30
पाषाण येथील विजया लक्ष्मी सुपर मार्केट या दुकानातूनही अशाच प्रकारे २० हजार रुपये घेतल्याचे निष्पन्न
पुणे : लॉकडाऊनमुळे जीवनावश्यक वस्तूंची चढ्या भावात अनेक दुकानदार विक्री करतात. पोलिसांनी अशा दुकानदारांवर कारवाई केली आहे. त्याचा गैरफायदा घेऊन भारत सरकारच्या ग्राहक मंचचा अधिकारी असल्याचा बनाव करुन दुकानदारांकडून खंडणी उकळणाऱ्या तोतयास खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत अगोदर तक्रार आल्यावर त्यांनी पडताळणी केली. त्यात तो सरकारी अधिकारी नसल्याने त्याची माहिती शहर पोलिसांना देण्यात आली होती.
निशिकांत रामचंद्र धुमाळ (वय ४५, रा. ग्रीन व्हिला सोसायटी, सूस रोड, पाषाण) असे त्याचे नाव आहे. त्याने त्यांच्या चारचाकी गाडीला भारत सरकार असा बोर्ड लावून मी ग्राहक मंचाचा अधिकारी असल्याचे सांगत होता. त्याने पाषाण येथील विजया लक्ष्मी सुपर मार्केट या दुकानातूनही अशाच प्रकारे धमकावुन २० हजार रुपये घेतल्याचे निष्पन्न झाले आहे.
निशिकांत धुमाळ हा पाषाण येथील धनश्री सुपर मार्केट या दुकानात गेला होता. दुकानाचे मालक मांगीलाल तानाजी चौधरी यांना मी ग्राहक मंचाचा अधिकारी असे सांगून तुम्ही चढ्या दराने मालाची विक्री करता व तुम्ही बील देत नाही. तुमचे दुकान सील करु़. तुम्हाला दंड भरावा लागेल, अशी धमकी दिली. कारवाई न करण्यासाठी सव्वा लाख रुपयांची मागणी केली. त्यावर चौधरी यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याची तक्रार केली. त्यांनी या तक्रारीच पडताळणी केली. तेव्हा त्यात धुमाळ याने तडजोड करुन ३० हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. पडताळणी करीत असताना धुमाळ हा लोकसेवक नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर ही तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पुणे शहर पोलिसांकडे पाठविली.
गुन्हे शाखेतील खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते व त्यांच्या पथकातील उपनिरीक्षक महाडिक, हवालदार मगर, गुरव, पोलीस नाईक मंगेश पवार यांनी निशिकांत धुमाळ याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील ग्राहक मंच भारत सरकार असा बोर्ड व ओळखपत्र, चारचाकी गाडी जप्त केले आहे. चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.