पोलिस भरतीसाठी बनावट प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र, दहा तोतया उमेदवारांवर गुन्हा दाखल
By नम्रता फडणीस | Published: October 14, 2023 06:05 PM2023-10-14T18:05:55+5:302023-10-14T18:06:52+5:30
पुणे : पोलिस भरतीसाठी बोगस प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र तयार करीत बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रमाणपत्र दिले असल्याचे भासवत पुणे ग्रामीणच्या पोलिस ...
पुणे :पोलिस भरतीसाठी बोगस प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र तयार करीत बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रमाणपत्र दिले असल्याचे भासवत पुणे ग्रामीणच्या पोलिस अधीक्षक कार्यालयाची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शासनाची फसवणूक करणाऱ्या दहा तोतया उमेदवारांविरुद्ध चतु:शृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोमिनाथ सुधाकर कंठाळे (बीड), अजय बब्रुवान जरक (सोलापूर), अक्षय बाळासाहेब बडदे (पुणे), दिनेश अर्जुन कांबळे (बीड), राजेश रमेश धुळे (पुणे), अमोल विठ्ठल गरके (नांदेड), ध्रुपद प्रल्हाद खराडे (नांदेड),
गोविंद भक्तराज मिटके (नांदेड), आसाराम बाळासाहेब चौरे ( बीड) आणि हेमंत विठ्ठल निकम (पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या तोतया उमेदवारांची नावे आहेत. याप्रकरणी पोलिस उप अधीक्षक युवराज मोहिते यांनी फिर्याद दिली आहे. दि. 5 जानेवारी ते 25 फेब्रुवारी दरम्यान हा प्रकार घडला.
2021 मध्ये पोलिस शिपाई भरती जाहीर करण्यात आली होती. पुणे ग्रामीण पोलिस मुख्यालयातर्फे ही भरती प्रक्रिया 2023 मध्ये राबविण्यात आली. भरती प्रक्रियेदरम्यान दहा आरोपींनी प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र सादर केली. ही प्रमाणपत्रे त्या त्या जिल्हयातील जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पडताळणीसाठी पाठविण्यात आली. त्यामध्ये बीडच्या जिल्हाधिका-यांनी आम्ही अशी कोणतीही प्रमाणपत्रे दिली नसल्याचे सांगितले. या आरोपींनी 2009 ते 2015 दरम्यान आधीच प्रमाणपत्र काढून ठेवली होती. त्यांनी बोगस प्रमाणपत्रे तयार करुन पुणे ग्रामीणच्या पोलिस अधीक्षक कार्यालयाकडे सादर केले असल्याचे निष्पन्न झाले अशी माहिती तपास अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक संभाजी गुरव यांनी दिली.