वाढीव जागेचा ताबा देण्यासाठी तहसीलदारांची केली बनावट स्वाक्षरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:08 AM2021-06-10T04:08:49+5:302021-06-10T04:08:49+5:30
रांजणगाव सांडस: मांडवगण फराटा येथील दोन शेतकऱ्यांना वाढीव जागेचा ताबा देण्यासाठी तहसीलदारांच्या बनावट स्वाक्षऱ्यांचा वापर केल्याचा धक्कादायक प्रकार ...
रांजणगाव सांडस: मांडवगण फराटा येथील दोन शेतकऱ्यांना वाढीव जागेचा ताबा देण्यासाठी तहसीलदारांच्या बनावट स्वाक्षऱ्यांचा वापर केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी काही शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी, तहसीलदारांकडे तक्रार दाखल केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आली आहे. दरम्यान, उपविभागीय अधिकाऱ्यांनी नायब तहसीलदारांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, मांडवगण फराटा येथील वाल्मीकी महादेव फराटे, गंगुबाई महादेव फराटे यांच्या मालकीच्या गट नं. २५६/१, २५६/२ यांच्या क्षेत्राची हद्द कायम करायची होती. त्यासाठी त्यांनी तहसील कार्यालयाकडे अर्ज केला होता. फेब्रुवारी महिन्यात पोलीस बंदोबस्तात मोजणी करण्यात आली. त्यावेळी फराटेंची हद्दीत नजीक असणाऱ्या शेतात पाच ते सहा फुटांपर्यंत अधिक दाखवण्यात आली. या घटनेनंतर ज्यांच्या शेतांमध्ये हे वाढीव क्षेत्र दाखवण्यात आले, ते सचिन गोरख जाधव, अलका बबन शेलार, गोपीचंद सदाशिव फराटे यांनी थेट तहसील कार्यालयात धाव घेतली. तहसीलदार लैला शेख यांची भेट घेऊन सर्व कागदपत्रे दाखविण्यात आली. त्यावेळी सचिन जाधव यांचे व वाल्मीकी फराटे, गंगुबाई फराटे यांचे हद्द निश्चितीच्या पूर्वीच्या कागदपत्रांमध्ये बरोबर होते. तरीही पुन्हा हद्द निश्चित करताना सचिन जाधव यांच्या जागेत अतिक्रमण केले असल्याचे समोर आले. एवढेच नाही तर सचिन जाधव यांनी मंडलाधिकाऱ्यांना दिलेला आदेश, तसेच पोलिसांना बंदोबस्तासाठी पाठवलेल्या पत्रा तसेच शेतकऱ्यांना बजवायच्या नोटिसांवरही तहसीलदारांच्या स्वाक्षऱ्या असल्याचे समोर आले.
तहसीलदार लैला शेख यांना या पत्रावर व नोटिसांवर आपल्या स्वाक्षऱ्या नसल्याचे लक्षात येताच त्यांनी नायब तहसीलदार ज्ञानदेव यादव यांच्याकडे खुलासा मागितला. त्यानंतर सचिन जाधव यांनीही तहसीलदार तसेच उपविभागीय अधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज केला. त्यानुसार उपविभागीय अधिकाऱ्यांनीही नायब तहसीलदार ज्ञानेदव यादव यांच्याकडे खुलासा मागितला, परंतु त्यांनी काही दिला नाही. कोरोनाकाळात मोजणीसाठी असणाऱ्या नियमांचा वापर करत मंडाधिकाऱ्याना दिलेल्या आदेश तसेच संरक्षणासाठी मागितलेला पोलीस बंदोबस्ताच्या पत्रावरही तहसीलदारांच्या बनावट स्वाक्षऱ्या आढळल्याने शिरूरमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, उपवभागिय अधिकाऱ्यांनीही ज्ञानदेव यादव यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तहसीलदारांच्या स्वाक्षऱ्या कोणी केल्या? हे मात्र अजून गुलदस्तात असून कारवाई कोणावर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नायब तहसीलदार ज्ञानदेव यादव यांनी त्यांना कोणताही अधिकार नसताना मांडवगण फराटा येथील अतिक्रमणाचा ताबा मिळवण्याबाबत तहसीलदार म्हणून माझ्या खोट्या सह्या करून पोलीस बंदोबस्तासाठी परस्पर आदेश काढले असून त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर केला आहे. यादव यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई होण्याबाबतचा प्रस्ताव येत्या दोन दिवसांत वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवणार आहे.
एल.डी. शेख
तहसीलदार शिरूर