भोंदू समाजसेवकांना खंडणीच्या गुन्ह्यात अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:09 AM2021-06-21T04:09:21+5:302021-06-21T04:09:21+5:30
शिरूर : मांडवगण फराटा परिसरात काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर अवैध दारू विक्रीविरोधात रस्त्यावर उतरून बाटल्या फोडून आवाज उठवून समाजसेवक ...
शिरूर : मांडवगण फराटा परिसरात काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर अवैध दारू विक्रीविरोधात रस्त्यावर उतरून बाटल्या फोडून आवाज उठवून समाजसेवक असल्याचे भासवणाऱ्या दोघांना शिरूर पोलिसांनी खंडणीच्या गुन्ह्यात अटक केली आहे. त्याच्या दोन साथीदारांना रांजणगाव पोलिसांनी जबरी चोरीच्या गुन्ह्यात जेरबंद केले आहे.
अमोल आनंदा चौगुले व पप्पू आनंदा चौगुले असे अटक केलेल्या दोन आरोपींची नावे आहेत. तर या आरोपींचे साथीदार अजय सूर्यगंध व हृतिक परदेशी या दोघांना रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी जबरी चोरीच्या गुन्ह्यात अटक केली आहे. अमोल चौगुले याने त्याच्या साथीदारांसह मांडवगण फराटा येथे मार्च महिन्यातत दारू ओतून व्हिडीओ क्लिप तयार करून ती समाज माध्यमांवर व्हायरल केली होती. वास्तविक आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. या आरोपीने समाजसेवक असल्याचे भासविले होते. मात्र, गावात दहशतीच्या जोरावर अनेकांना त्रास देणे सुरू ठेवले होते. आरोपी हा स्वतः घरात अवैध दारू विक्री करत होता. अमोल व पप्पू यांच्या विरोधात खंडणीची तक्रार दाखल झाल्याने शिरूर पोलिसांनी या दोघांना विविध गुन्ह्यांच्या आरोपाखाली अटक केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी दिली आहे. तर अमोल चौगुले याचे दोन साथीदार अजय सूर्यगंध (रा. मांडवगण फराटा) व हृतिक परदेशी (रा. सादलगाव) यांना जबरी चोरीच्या गुन्ह्यात रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे.
सर्व आरोपी हे खंडणी मागणे, जबरी चोरी करणे, विनयभंग करणे, घातक हत्यारे सोबत बाळगून दमदाटी करणे, दहशत माजवणे या गुन्ह्यात पारंगत आहेत. अमोल चौगुले याच्यावर आठ गुन्हे तर पप्पू चौगुले याच्यावर ही आठ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी दिली आहे.