पाय घसरून खडकवासला धरणात पडला, विद्यार्थ्याचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2018 02:25 AM2018-08-31T02:25:38+5:302018-08-31T02:26:21+5:30
आई-वडिलांसोबत आला होता फिरायला
खडकवासला : आई-वडिलांबरोबर फिरायला आलेला राजस्थान येथील शालेय विद्यार्थी पाय घसरून खडकवासला धरणात बुडाला. त्याचा मृतदेह आज सकाळी सापडला. पार्थ जितेंद्र बात्रा (वय १४) असे त्याचे नाव आहे. काल बुधवारी सायंकाळी ५ वाजता ही घटना घडली. अग्निशामक दलाच्या जवानांनी आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी पोलिसांसह सायंकाळी त्याचा शोध घेतला; परंतु खोल पाणी, दलदल आणि अंधार पडल्यामुळे शोधकार्य थांबवण्यात आले होते.
राजस्थानातील जयपूर जिल्ह्यातील रिंगास येथे पार्थ राहण्यास होता. तो आई-वडिलांसह रक्षाबंधनानिमित्त पुण्यातील विश्रांतवाडी येथील त्याच्या आत्याकडे आला होता. जितेंद्र बात्रा यांचा बुधवारी वाढदिवस होता. त्यानिमित्ताने तो आई-वडिलांसमवेत खडकवासला धरणावर सकाळी फिरायला आला होता. त्यांच्याबरोबर आत्या आणि इतरही नातेवाईक होते. दुपारी चारच्या सुमारास डीआयएटीजवळच्या खडकवासला धरणाच्या तीरावरून फिरत असताना पाय घसरून तो पाण्यात पडला. तेथे पाणी खोल असल्याने तो बुडाला. नातेवाईक व इतर पर्यटकांनी आरडाओरडा केला. खडकवासला गावचे पोलीस पाटील ऋषिकेश मते आणि हवेली पोलीस ठाण्याचे जवान एम. ए. बाबर यांनी पोहून तीरालगतच्या परिसरात शोध घेतला. अग्निशामक दलाच्या जवानांनी शोध घेऊनही तो सापडला नाही. नंतर अंधार पडल्यामुळे शोधकार्य थांबविण्यात आले होते.